Mon, Aug 19, 2019 00:41होमपेज › Pune › पुण्यात बस कठड्याला धडकून १५ प्रवासी जखमी

पुण्यात बस कठड्याला धडकून १५ प्रवासी जखमी

Published On: Jul 02 2018 12:05PM | Last Updated: Jul 02 2018 12:05PMपुणे : प्रतिनिधी

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) खासगी तत्त्वावरील चालविण्यात येणारी कात्रज-निगडी बस कठड्याला धडकून १२ ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना वारजे पुलानजीक सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली आहे. बस क्रमांक आर ५३९ मध्ये निगडीच्या दिशेने जाणारे ३५ ते ४० प्रवासी बसमधून प्रवास करत असल्याची माहिती पीएमपीएल प्रशासनाने दिली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पीएमपीएल महामंडळाच्या खासगी ताफ्यातील बसला अपघात घडल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. धावती बस कठड्याला धडकल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. महामंडळाच्या मालकी आणि खासगी तत्त्वावर चालविण्यात येणार्‍या काही गाड्यांची फिटनेस तपासणी न झाल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल महामंडळ गंभीर कधी होणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पीएमपीएल व्यवस्थापिका कार्यक्रमात व्यस्त

बसला अपघात झाल्यानंतर दैनिक पुढारीच्या बातमीदाराने पीएमपीएल व्यवस्थापिका नयना गुंडे यांना फोन केला असता, मी कार्यक्रमात आहे नंतर फोन करते असे उत्तर दिले. दरम्यान बातमीदाराने अपघाताची माहिती दिल्यानंतर गुंडेंनी महामंडळ कर्मचार्‍यांशी बोलून माहिती घेतली. 

अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केले असून, घटनास्थळावर तीन डेपो मॅनेजर, ट्रॉफिक कन्ट्रोलर उपस्थित आहेत. अपघाताची सर्व माहिती मागविली आहे.
नयना गुंडे, व्यवस्थापकीय संचालिका