Sat, Apr 20, 2019 10:25होमपेज › Pune › वर्षातील पहिली हत्या अन् खळबळ

वर्षातील पहिली हत्या अन् खळबळ

Published On: Jan 15 2018 1:43AM | Last Updated: Jan 15 2018 1:43AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील गुन्हेगारीने आता नवनवीन विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच शहरात तोडफोड आणि सोनसाखळी चोरट्यांनी धिंगाणा घातला. त्यातच आता शहरातील उच्चभ्रू परिसर समजल्या जाणार्‍या डेक्कन भागात गोळ्या झाडून बिल्डरची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष पुणे पोलिसांना खडतर आणि आव्हानात्मक जाण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या वर्षात खुनाचे प्रकार कमी झाले असले तरी वर्षाची सुरुवात मात्र मोठ्या हत्येच्या घटनेने झाल्याचे बोलले जात आहे. 

शांत आणि सुसंस्कृत शहराची ओळख आता कधीच पुसली गेली आहे. येथे दिवसाढवळ्या खून, तोडफोड, गोळीबार, राडा आणि लूटमार होत आहे. घराच्या परिसरात फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांना लुटले जात आहे. कुटुंबासोबत  असणार्‍या  महिलेच्या गळ्यातील  सोनसाखळी भरदिवसा पळवल्याची घटना ताजी आहे.  त्यामुळे शहरात कधी काय होईल, याचा नेम राहिलेला नाही. शहराची लोकसंख्या वाढली की, गुन्हेगारी वाढते असे समजले जाते, परंतु पोलिसांचा अंकुश न राहिल्यास गुन्हेगारी फोफावते, हेही एक सत्य आहे. त्यामुळे एकूणच गत वर्षातील गुन्हेगारी पाहता पुणेकरांना सुरक्षितता देण्यात पुणे पोलिसही अपयशी पडल्याचे दिसत आहे.  मनुष्यबळाची कमतरता आहे, परंतु रस्त्यावरील गुन्हेगारी कमी करण्यास मागील वर्ष पुणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले. 

त्यातच वर्षातील सुरुवातीलाच घडलेल्या खुनाने शहरात खळबळ उडाली. देवेनभाई शहा या बिल्डरची डेक्कनसारख्या वर्दळीच्या भागात मध्यरात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यातील आरोपींचा थांगपत्ता 24  तासानंतरही पोलिसांना लागला नाही. 

दुसरीकडे डेक्कन भाग हा उच्चभ्रू वस्ती असणारा. त्यामुळे याठिकाणी छोटी घटनाही मोठे स्वरूप घेते. आता या खुनातील आरोपींना लवकर पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे असणार आहे. मात्र, गेल्या दहा दिवसांमधील घटना आणि या खुनाच्या घटनेने पुणे पोलिसांचा वर्षाचा प्रवास खडतरच ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.