Wed, Mar 27, 2019 03:56होमपेज › Pune › ‘बीआरटी’चे 100 पैकी 45 कि.मी. नेटवर्क पूर्ण

‘बीआरटी’चे 100 पैकी 45 कि.मी. नेटवर्क पूर्ण

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 06 2018 12:16AMनंदकुमार सातुर्डेकर :पिंपरी

 पिंपरी-चिंचवड महापालिकेने बीआरटीसाठी 100 किलोमीटरच्या नेटवर्कचे नियोजन केले होते. यापैकी पहिल्या टप्प्यातील 45 कि.मी.चे काम पूर्ण होत आले आहे. उर्वरित 55 कि.मी. पैकी बोपखेल फाटा ते आळंदी हा 9 कि.मी. रस्ता 90 टक्के विकसित झाला आहे. बस थांबे करण्याचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यानंतर या मार्गावर बीआरटी बस धावणार आहे. ‘पीएमपीएमल’ला बसेसचा आराखडा तयार करण्याबाबत पालिकेने पत्र पाठविले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने जलद सार्वजनिक बस वाहतुकीचे उद्दिष्ट ठेवून ‘बीआरटी’चे 100 कि.मी. नेटवर्क विकसित करण्याचे नियोजन केले. पहिल्या टप्प्यात 45 कि.मी. चे नियोजन होते. 22.5 कि.मी. नेटवर्क पूर्ण झाले आहे. सांगवी-किवळे 14.5 कि.मी. आणि नाशिक फाटा ते वाकड 8 कि.मी. या मार्गावर ‘बीआरटी’ धावत आहे. उर्वरित 22.5 कि.मी. पैकी निगडी ते दापोडी 12 कि.मी. रस्त्यावर तसेच काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी हा 10 कि.मी. रस्ता या मार्गावर ‘बीआरटी’ सुरू करण्यासाठी पालिकेची धावपळ सुरू आहे. या मार्गावर ‘बीआरटी’ धावू लागली की, बीआरटी चे 45 कि.मी. नेटवर्क पूर्ण होणार आहे.

भक्ती-शक्ती चौक ते मुक्ताई चौक किवळे हा 5.2 कि.मी. रस्ता विकसित करण्याचे काम सुरू आहे. बसथांबे बांधण्याच्या कामाच्या निविदेचे काम सुरू आहे. या रस्त्यावर निसर्ग दर्शन सोसायटीजवळ रेल्वेवरील उड्डाणपुलाचे काम 67 टक्के पूर्ण झाले असून, भूसंपादनाअभावी पुढील काम लांबले आहे. याबाबत माहिती घेतली असता भूसंपादनाबाबत आयुक्त स्तरावर बैठका झाल्या आहेत. मिळकत धारकांचे प्रश्‍न समजून घेऊन भूसंपादनाचे काम मार्गी लावण्याचे काम नगररचना विभागाकडून केले जात असून, लवकरच तोडगा निघेल असे सांगण्यात आले.