Wed, Feb 20, 2019 12:46होमपेज › Pune › राजमाची रस्त्यावरील पुलाचा भराव पूर्ण

राजमाची रस्त्यावरील पुलाचा भराव पूर्ण

Published On: May 01 2018 1:22AM | Last Updated: May 01 2018 12:37AMलोणावळा : वार्ताहर 

राजमाची किल्ल्याकडे जाणार्‍या मार्गावर दोन वर्षपूर्वी बांधण्यात आलेल्या पुलाच्या जोड रस्त्याचे अर्धवट ठेवण्यात आलेल्या भरावाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पी.डब्लू.डी.) वतीने अखेर पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय या मार्गावर कुणे गाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुरू असलेले अतिक्रमण थांबवले असून, ग्रामपंचायत कुणे गाव यांना हा मार्ग पूर्ववत करून देण्याच्या सूचना पीडब्लूडी कडून देण्यात आल्या आहेत. राजमाचीकर ग्रामस्थांची मागणी आणि दै. ‘पुढारी’ने या प्रश्नाचा केलेला पाठपुरावा यामुळे अखेर ही कामे मार्गी लागली आहेत.

मावळचे आ. संजय भेगडे यांच्या निधीमधून आणि पीडब्लूडी च्या माध्यमातून राजमाची रस्त्यावर मागील काही वर्षात या मार्गावर पूल उभारणे, साकव बांधणे, शक्य त्या ठिकाणी काँक्रीटीकरण करणे या कामासाठी आमदार भेगडे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मागील 3 ते 4 वर्षात खर्च करण्यात आला आहे. यातून राजमाची मार्गावर 4 मोठे पूल, 3 ते चार साकव पूल, एक किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता तर एका अवघड ठिकाणी काही फूट लांबीचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मात्र या मार्गावर बांधण्यात आलेल्या एका पुलाच्या दोन्ही बाजूचा जोडरस्ता पुलाला जोडण्याचे काम मागील दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले होते. अर्धवट आणि तात्पुरत्या स्वरूपात एक गाडी जाईल एवढाच मातीचा भराव याठिकाणी टाकण्यात आला होता.

ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही हा भराव पूर्ण करण्यात न आल्याने आगामी पावसात हा संपूर्ण भराव पाण्यासोबत वाहून जाऊन राजमाची गावाचा संपर्क तुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. पावसाळा हा राजमाची कडे जाणार्‍या पर्यटकांचा सर्वाधिक आवडता ऋतू. त्यामुळे पुलाच्या बाबतीत एखादी दुर्दैवी घटना घडल्यास गावकार्‍यांसोबत पर्यटकही अडचणीत येण्याची शक्यता होती.याबाबत दैनिक ‘पुढारी’ने मागील आठवड्यात वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पी.डब्लू.डी.) अधिकार्‍यांनी तातडीने दखल घेऊन अर्धवट सोडलेले काम संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण करून घेतले.

Tags : Pimpri, bridge, road, filled, flood