Tue, May 21, 2019 13:09होमपेज › Pune › सांगवी पुलाचे बीम, कठडेही कोसळले

सांगवी पुलाचे बीम, कठडेही कोसळले

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 27 2018 10:12PMवडगाव मावळ : वार्ताहर 

वडगाव-सांगवी रस्त्यावर खापरे ओढ्यावरील अखेरच्या घटका मोजणार्‍या पुलाच्या एका बाजूचा निसटलेला बीम व त्यावरील संरक्षक कठडे बुधवारी रात्री पावसामुळे कोसळले असून, पर्यायी रस्ताही वाहून गेल्याने अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अजूनही प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्षच आहे. अत्यंत दुरवस्थेत असलेल्या या पुलासंदर्भात ‘पुढारी’ने वेळोवेळी पाठपुरावा केला असून, दि. 25 मे रोजी ‘सांगवी पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत’ असे वृत्त प्रसिध्द करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.

दोन वर्षांपूर्वी या पुलाच्या सांगवी बाजूकडील भाग खचला होता; तसेच खालच्या बाजूच्या स्लॅबचे लोखंडी बारही तुटलेले होते व पश्‍चिमेकडील बीम कोसळण्याच्या स्थितीत होते. बुधवारी रात्री हे बीमच निखळून पडले असून, त्यावरील संरक्षक कठडेही खाली पडले आहेत. याशिवाय, पर्यायी मार्ग म्हणून पुलाच्या बाजूला केलेला कच्चा रस्ताही वाहून गेला आहे. त्यामुळे आता सांगवी ग्रामस्थांना या पुलावरून ये-जा करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. आतातरी याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अन्यथा दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सांगवी पूल कोसळण्याच्या स्थितीत असतानाही प्रशासनाकडून मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून याबाबत लवकर निर्णय न घेतल्यास सबंधीत अधिकार्‍यांना कार्यालयामध्ये बसून देणार नाही असा इशारा सोपानराव खांदवे, काशिनाथ तोडकर, अनिल खांदवे, विकास लालगुडे उमेश ढोरे यांनी ‘पुढारी’ शी बोलताना दिला.