Tue, Aug 20, 2019 04:09होमपेज › Pune › लाचखोर महिला उपनिरीक्षक जाळ्यात

लाचखोर महिला उपनिरीक्षक जाळ्यात

Published On: Dec 07 2017 1:24AM | Last Updated: Dec 07 2017 12:03AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक सपना सोळंकी (वय 27, रा. परमारनगर, फातीमानगर) यांना 37 हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. बुधवारी सायंकाळी ही कारवाई वारजे माळवाडी पोलिस चौकीतच करण्यात आली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या दीड महिन्यातील पुणे पोलिस दलात लाच खोरीतील हा तिसरा प्रकार असून, यापूर्वी एका महिला उपनिरीक्षकासह अधिकार्‍याला लाच घेताना  रंगेहात पकडले आहे. त्यामुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, लाचखोरीच्या वाढत्या प्रकरणांमुळे  पुणे पोलिस दलाची प्रतिमा डागाळत आहे. 

सपना सोळंकी या वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गेल्या दीड वर्षापासून नेमणुकीस आहेत.    त्यांना वारजे माळवाडी पोलिस चौकीत नेमणूक देण्यात आली होती.  तक्रारादारांनी  काही दिवसांपूर्वी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे. तर, तक्रारदार यांच्याविरोधातही पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज आलेला आहे. या अर्जाची चौकशी करण्यासाठी उपनिरीक्षक सपना सोळंखी यांच्याकडे हे अर्ज देण्यात आले आहेत.

मात्र, सोळुंकी यांनी तक्रारदार यांनी दिलेल्या अर्जावर त्यांच्या बाजूने मदत करण्यासाठी, तसेच त्यांच्याविरुद्ध आलेल्या अर्जावर कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडे 40 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची एसीबीने पडताळणी केली. त्यात सोळंकी यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी सायंकाळी सापळा कारवाई करत वारजे माळवाडी पोलिस चौकीत तडजोडी अंती तक्रारदार यांच्याकडून 37 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. 

काही दिवसांपूर्वीच कोंढवा पोलिस ठाण्यातील एका महिला उपनिरीक्षक आणि कर्मचार्‍याला लाच घेताना पकडण्यात आले होते. तर, त्यानंतर पिंपरी-चिंचवडीमधील एका अधिकार्‍याला 50 हजारांची लाच घेताना पकडण्यात आले होते. या घटना गेल्या दीड महिन्यात घडल्या आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांची प्रतिमा डागाळत आहे.