होमपेज › Pune › शहरात टोळक्यांचा राडा सुरूच

शहरात टोळक्यांचा राडा सुरूच

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 13 2018 12:17AMपिंपरी : प्रतिनिधी 

शहरात सलग दुसर्‍या दिवशीही टोळक्यांचा राडा सुरूच आहे. गेल्या 24 तासात भोसरी येथे सोळा तर निगडीत सुमारे आठ असे एकूण 24 वाहनांची तोडफोड केली आहे. नंग्या तलवारींचा नाच करीत धुडगुस घातला जात असल्यामुळे शहरातील नागरिक दहशतीखाली आहेत.  वाढत्या प्रकारांमुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शहर अशांत आहे. वाकड, थेरगाव, पुनावळे, भोसरी, निगडी, चिखली, पिंपरी आदी परिसरात वाहन तोडफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. केवळ परिसरात दहशत माजवण्यासाठी सर्वसामान्य जनतेची वाहने फोडली जात असल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत.भोसरीतील आदिनाथ नगरमध्ये रविवारी  रात्रीच्या सुमारास हातात दांडकी, लोखंडी रॉड घेऊन 16 वाहनांची तोडफोड झाली. या प्रकरणातून शहरवासीय सावरण्याआधीच निगडीतील सहयोग नगर येथे सोमवारी (दि. 11) रात्री पुन्हा तोडफोड झाली. रात्री अकराच्या सुमारास किरकोळ कारणावरून भांडण सुरू होते. याच भांडणातून परिसरातील चार वाहनांवर दगड आणि काठ्या मारून तोडफोड केल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे; मात्र प्रत्यक्षात सुमारे आठ वाहनांची तोडफोड करण्यात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. निगडीच्या प्रकरणात पोलिसांनी तोडफोड करणार्‍या तीन मुलांना ताब्यात घेतले आहे. सलग दोन दिवस तोडफोड सत्र सुरू असल्याने सामान्य जनतेच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. तोडफोड प्रकरणात अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याने पोलीस कारवाईमध्ये मोठी बंधने येत आहेत.