Sat, Jul 20, 2019 14:58होमपेज › Pune › ‘पुरंदर’ बोगस असल्याचे शासनाकडून होणार जाहीर 

‘पुरंदर’ बोगस असल्याचे शासनाकडून होणार जाहीर 

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 12:29AMपुणे : प्रतिनिधी

पुरंदर विद्यापीठ हे बोगस असल्याचे शासनातर्फेच जाहीर करण्याचा निर्णय राज्याचे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री रवींद्र वायकर यांनी जाहीर केला आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी होईल.

 उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग या दोन्ही विभागांनी पुरंदर विद्यापीठाची पाहणी केली. या पाहणीत हे विद्यापीठ बोगस असल्याचे सिद्धदेखील झाले. परंतु या दोन्ही विभागांमार्फत अद्यापपर्यंत या विद्यापीठावर कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे पुरंदर विद्यापीठाचा सूत्रधार दादा जगताप मात्र मोकाट सुटला होता. तसेच दादा जगताप याने या वर्षीदेखील विद्यापीठाकडून विविध कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यामुळे पुरंदर विद्यापीठावरील कारवाईबाबत मात्र प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते.

विद्यापीठाची पाहणी करण्यासाठी वायकर पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे शहरात नियमबाह्य पदव्या देणार्‍या तसेच एआयसीटीई आणि विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसी या शिखर परिषदांच्या नियमांचे उल्लघंन करणार्‍या महाविद्यालये तसेच संस्थांवरील कारवाईबाबत विचारले असता वायकर म्हणाले, लोक खोट्या आश्‍वासनांना बळी पडतात. त्यामुळे पुरंदर विद्यापीठ हे बोगस आहे. या विद्यापीठात कोणीही प्रवेश घेऊ नये, अशा प्रकारचे वृत्त शासनाकडून माध्यमांमध्ये प्रकाशित करावे. तसेच या विद्यापीठावर येत्या सात दिवसांमध्ये एफआयआर दाखल करावा, असे स्पष्ट आदेश त्यांनी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांना दिले आहेत. तर माने यांनी देखील या विद्यापीठावर गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेल्या बारा ते पंधरा वर्षांपासून बोगस पदव्यांचा बाजार मांडून मागेल त्याला हवी ती पदवी देऊन कोट्यवधींची माया गोळा करणार्‍या पुरंदर विद्यापीठाचा सूत्रधार दादा जगतापवर येत्या काही दिवसांमध्ये कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.