Mon, Jul 22, 2019 13:10होमपेज › Pune › बोगस मुख्याध्यापकाची वैयक्तिक मान्यता रद्द

बोगस मुख्याध्यापकाची वैयक्तिक मान्यता रद्द

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 1:21AMपुणे  : लक्ष्मण खोत 

बालेवाडी येथील खासगी अनुदानित खंडेराय प्रतिष्ठान प्राथमिक विद्यालयात सेवेत नसतानाही, बोगस पुराव्यांच्या आधारे मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या घनश्याम म्हस्के यांची वैयक्तिक शिक्षक मान्यता रद्द करण्याचा आदेश मंगळवारी शिक्षण उपसंचालकांनी दिला.  घनश्याम म्हस्के यांची मुख्याध्यापक पदाची मान्यता बोगस असल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. तसेच संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक म्हस्के यांची शिक्षक मान्यता बोगस असल्याचा आरोप संदीप आडकर यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे केला होती. यापूर्वी शाळेत सेवेत असणार्‍या आडकर यांनी मुख्याध्यापक म्हस्के यांची नियुक्ती बोगस असून, त्यांना बेकायदेशीरपणे बोगस सेवा दाखवत नियुक्त केल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे केली होती.

शाळेला सन 2012 साली 20 टक्के अनुदान मंजूर झाल्यानंतर संस्थेचे संस्थाचालक गणपत बालवडकर यांनी म्हस्के या नातेवाईकाची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती केली. त्यासाठी म्हस्के यांनी शाळेत 2007 ते 2012 या कालावधीत काम केल्याचे दाखवण्यात आले; मात्र त्यांनी या कालावधीत कोणतीही सेवा बजावली नसून त्यांची नियुक्ती बोगस असल्याचा आरोप आडकर यांनी केला होता. याबाबत शिक्षण उपसंचालकांनी संस्थाचालक बालवडकर आणि मुख्याध्यापक म्हस्के यांना सुनावणीवेळी वारंवार मुलाखतीचे पत्र, शाळेत काम केल्याचा पुरावा म्हणून शाळेची हजेरी पुस्तिका, शाळा तपासणी अहवाल, शेरेबुक आदी पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते.

तसेच म्हस्के यांनी शाळेत सेवेत असताना डीएड केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याने त्यांना सेवेत असताना डीएड साठी रजा घेतली होती का, कोणत्या अध्यापक विद्यालयात प्रवेश घेतला होता, आदी पुरावे सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी दिले होते. मात्र, म्हस्के आणि संस्थाचालकांना हे पुरावे सादर करता न आल्याने शिक्षण उपसंचालकांनी 16 जानेवारी 2017 रोजी म्हस्के यांच्या मुख्याध्यापक पदाच्या मान्यतेला स्थगिती देत, एका महिन्याच्या मुदतीत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, त्यानंतरही पुरावे सादर न केल्याने शिक्षण विभागाने 7 दिवसांची अंतिम मुदत देत पुरावे सादर करण्यास सांगितले. अखेर पुरावे सादर न केल्याने मंगळवारी संबंधित मुख्याध्यापक घनश्याम म्हस्के यांनी शिक्षक मान्यता रद्द करण्याचा आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिला.