Fri, Jul 19, 2019 17:44होमपेज › Pune ›  ब्लॉग:  बी पॉझिटिव्ह 

 ब्लॉग:  बी पॉझिटिव्ह 

Published On: Mar 23 2018 3:07PM | Last Updated: Mar 23 2018 3:07PMसकारात्मक विचार करणे हा मानवी प्रगतीचा पाया आहे. एखादी गोष्ट शक्य आहे किंवा होऊ शकते असे वाटले नसते, तर माणूस कदाचित आजही गुहेत राहत असता. श्रद्धेने पहाडही हलवता येऊ शकतो अशा अर्थाचे बायबलमध्ये एक वचन आहे. श्रद्धा ही धार्मिकच असायला हवी असे नाही, तर आपल्या क्षमतेवरची आपली श्रद्धा, समाजातील चांगुलपणावरची श्रद्धा किंवा अगदी देशाच्या घटनेवरची श्रद्धा देखील आपल्याला अनेक पहाड हलवण्याची ताकद देते.

‘सरहद’च्या आजवरच्या वाटचालीमध्ये आम्ही सर्वांनीच या गोष्टीचा अनेक वेळा प्रत्यय घेतलेला आहे. अगदी सुरुवातीला, म्हणजे १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा पंजाब हिंसाचाराच्या आगीत जळत होता, तेव्हा मी आणि माझे काही मित्र खूप अस्वस्थ झालो होतो. आपल्या देशाच्या या महत्त्वाच्या राज्याकरता आपण काहीतरी करायला हवे असे आम्हाला खूप वाटत होते. मग आम्ही ‘वंदे मातरम’ ही संघटना स्थापन केली आणि एक दिवस सरळ पंजाबचा रस्ता धरला. दहशतवाद्यांना पाकिस्तानची फूस आहे, तिकडून त्यांना मदत मिळते, ते भारतविरोधी घोषणा देतात वगैरे माहीत असल्यामुळे आम्ही स्वाभाविकच तिथे जाऊन ‘भारतमाता की जय’ वगैरे घोषणा देत रस्त्यांनी फिरायला लागलो. 

फतेहगढ़ चुडिया नावाच्या एका गावामध्ये आम्ही जात असताना सरबजीतसिंग भिंडर नावाचा शीख तरुण आम्हाला भेटला. ‘हे तुम्ही काय करता आहात?’ असे त्याने आम्हाला विचारले. ‘इथल्या लोकांमध्ये देशभक्ती जागृत करण्याचा प्रयत्न करतो आहोत,’ आम्ही म्हणालो. त्यावर तो हसला आणि म्हणाला, ‘या गावामध्ये घरटी किमान एक माणूस भारतीय लष्करात आहे. कित्येक कुटुंबांमध्ये तर लष्करातली नोकरी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. आजवर या गावातल्या लोकांनी अनेक वीरचक्रे आणि शौर्यपदके मिळवलेली आहेत आणि त्यांना तुम्ही देशभक्ती शिकवणार?’

आम्ही खजिल झालो. आमच्या लक्षात आले की आपली विचारांची दिशा कुठेतरी चुकते आहे. समोरच्या व्यक्तीची समस्या नेमकी जाणून घेण्याऐवजी त्यालाच तो कसा चुकतो आहे हे सांगणे, हा आमचा नकारात्मक विचार होता. मग आम्ही आमच्या विचारांची दिशा बदलली आणि शांततेसाठी पदयात्रा सुरु केल्या. हिंसाचाराचा फटका बसलेल्यांच्या मानसिक, शारीरिक जखमांवर फुंकर घालायला सुरुवात केली. १९८७ साली पंजाबमध्ये आलेल्या एका पुरामध्ये आम्ही शीख कुटुंबांकरता मदतकार्यात स्वतःला झोकून दिले. एका कुटुंबाला वाचवताना आमचा एक धाडसी सहकारी दत्तात्रय गायकवाड याने तर आपल्या प्राणांचे बलिदान केले. याचा परिणाम आम्हाला ताबडतोब दिसायला लागला. ही मुले (आम्ही सर्वजण तेव्हा विशीपंचविशीतले तरुण होतो) सुदूर महाराष्ट्रातून, स्वतःच्या पैशांनी येतात आणि मदतकार्य करतात, शांततेसाठी गावा-गावात फिरतात, हे तिथल्या जीवनसिंग उमरानांगल यांच्यासारख्या नेत्यांच्या, एस. एस. विर्क यांच्यासारख्या पोलीस अधिका-यांना, विजयकुमार चोपडांसारख्या ज्येष्ठ पत्रकारांना जाणवले आणि त्यांनी आम्हाला आमच्या कार्यात त्यांच्या-त्यांच्या पातळीवरून खूप आपुलकी आणि वडिलकीने मदत केली, मार्गदर्शन केले.

पुढे काश्मीरमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर एक असाच अनुभव आला. श्रीनगरमधील सुप्रसिद्ध लाल चौकात आपण पाकिस्तानी झेंडा जाळायचा असे ठरवून आम्ही तिथे गेलो. जागोजाग लष्करी चौक्या आणि खडा पहारा होता. एका ठिकाणी आम्ही जमलो. योगायोगाने तिथे तैनात असलेला जवान एक मराठी माणूस होता. सातारा जिल्ह्यातले दत्तोबा पवार. ते आम्हाला म्हणाले, ‘तुम्ही ज्या भावनेने हे झेंडा जाळण्याचे कृत्य करू इच्छित आहात, ती मी समजू शकतो, पण याचा परिणाम काय होईल याचा तुम्ही विचार केला आहे का?’ आम्ही अर्थातच त्याबाबत काही विचार केलेला नव्हता. मग दत्तोबांनी आम्हाला समजावून सांगितले की आम्ही झेंडा जाळून, तासभर घोषणा वगैरे देऊन नंतर आपापल्या घरी परतू. पण त्यानंतर तिथे जे घडेल, त्याला दत्तोबांसारख्या जवानांना आणि पोलिसांना तोंड द्यावे लागेल. कदाचित त्यांच्यापैकी काही जणांचा जीवही जाऊ शकतो. पुन्हा एकदा, आमची भावना योग्य असली तरी कृतीमागचा विचार नकारात्मक होता हे आमच्या लक्षात आले. 

झेंडा जाळणे ही निश्चितच एक नकारात्मक कृती होती. त्यापेक्षा काश्मिरी लोकांमध्ये मिसळून त्यांना समजावून घेणे, त्यांच्या मनातील रोषाचे कारण जाणून घेणे अशा अनेक गोष्टी आम्ही करू शकतो, हे आम्हाला जाणवले. आम्ही नेमके तेच करायला सुरुवात केली.

पुढे कारगिल युद्ध झाले. आपल्या लष्कराने अतुलनीय शौर्य दाखवून या युद्धात विजय मिळवला. तोवर काश्मीरमध्ये काम करायला लागून दहा वर्षे होत आली होती. आमच्या असे लक्षात आले की, इथल्या बहुतेक लोकांनी आणि विशेषतः मुलांनी भारत पाहिलेलाच नाही. भारत म्हणजे लष्कर, भारत म्हणजे कर्फ्यु, भारत म्हणजे जुलूम, दडपशाही, लाठीमार, गोळीबार असेच त्यांचे मत होते. हे नकारात्मक मत बदलण्यासाठी काय करता येईल असा विचार आम्ही करत होतो आणि त्यातून ‘नोव इंडिया’ या, काश्मीरमधील मुलांच्या भारतयात्रेची कल्पना पुढे आली. कारगिल युद्धानंतर तिथल्या वय वर्षे पाच ते सोळा या वयोगटातली सत्तर मुले आम्ही काश्मीरबाहेर घेऊन आलो. ही मुले-मुली पहिल्यांदाच काश्मीरबाहेर पाऊल ठेवत होती. त्यांचा पहिला मुक्काम पुण्यात होता. इथे जेव्हा त्यांनी पाहिले की रस्त्यावर क्वचितच एखादा पोलीस दिसतो, लष्करी जवान तर कुठेच दिसत नाहीत, लोक मोकळेपणी दिवसाच्या कुठल्याही वेळी मजेत रस्त्यांवरून फिरतात, कुठे बंदुकीचा आवाज नाही की बाँबस्फोट ऐकू येत नाही, तेव्हा त्या मुलांना खूप आश्चर्य वाटले. त्यांनी असे वातावरण त्यांच्या आजूबाजूला कधी पाहिलेलेच नव्हते. पुण्यातल्या हिंदू मुलांनीही त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या, खेळ खेळले, कुठेही जात, धर्माच्या भिंती आडव्या आल्या नाहीत हेही त्यांच्या दृष्टीने अप्रूप होते.

त्यानंतर दरवर्षीच या यात्रा होत राहिल्या. मुले बदलत राहिली. एका यात्रेत मुलांना मुंबई दाखवली, एका वेळी त्यांना नागपूरला आणि तिथे चैत्यभूमी, रा. स्व. संघाचे मुख्यालय अशा ठिकाणी नेले, एकदा दिल्लीला सोनिया गांधींची भेट घडवली, एकदा बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, अमिताभ बच्चन, हृतिक रोशन, शाहरुख खान अशा लोकांना भेटवले. हे सगळे पाहून या मुलांची दृष्टीच बदलली.

आजवर भारताला नकारात्मक रूपात पाहिल्यावर अचानक त्यांना जेव्हा भारताचा सहिष्णू, शांततामय, प्रगतीशील चेहरा दिसला, तेव्हा त्यांच्यामध्ये खूप बदल झाला. त्यांच्यापैकीच १५० मुले-मुली आज सरहदमध्ये शिकत आहेत, काही शालेय शिक्षण पूर्ण करून बाहेर पडली आहेत. कधीकाळी मोठे झाल्यावर हातात बंदूक घेण्याची भाषा करणारी यांच्यापैकी काही मुले, आज त्यांच्यामध्ये स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर आपले राज्य आणि आपला भारत देश यांच्याकरतादेखील काहीतरी करण्याची उमेद निर्माण झालेली आहे. हा पॉझिटिव्ह विचारांचाच परिणाम आहे.

असे अनेक प्रसंग सांगता येतील. या वर्षी ईशान्य भारतातून १८ बोडो मुले-मुली आमच्या सरहदमध्ये दाखल झाली. या मुलांना त्यांच्या बोरो भाषेव्यतिरिक्त कुठलीही भाषा येत नव्हती. ती जेव्हा आमच्या संस्थेत राहायला लागली तेव्हा आम्हाला एक अत्यंत आनंददायी, सुखद दृष्य पाहायला मिळाले. काश्मिरी मुले, ईशान्य भारतातील मुलांना, महाराष्ट्रात बसून मराठी आणि हिंदी शब्द शिकवायला लागली, हे ते दृष्य.

हे आमच्या स्वतःच्या सकारात्मक विचारांमुळेच शक्य झाले आहे. एखाद्याला विरोध करणे, ठोश्याला ठोसा देणे ही सहजप्रवृत्ती आणि काही बाबतींमध्ये आवश्यक कृती असली, तरी देश जोडण्याकरता, समाज एकसंध ठेवण्याकरता या गोष्टी उपयोगी नाहीत. त्याकरता इतरांना समजून घेणे, त्याचा वेगळेपणा स्वीकारून त्यांच्याशी माणुसकीचे संबंध जोडणे अशा सकारात्मक विचारांची गरज आहे. नकारात्मक विचार अधोगतीकडे नेणारे तर सकारात्मक विचार प्रगतीचा मार्ग उजळवणारे असतात. तेव्हा, बी पॉझिटिव्ह!

संजय नहार
सरहद, पुणे

Tags : blog, be positive, sarhad institution, pune