Tue, Apr 23, 2019 14:16होमपेज › Pune › हिंजवडीत ‘वेलकम टू डार्क वर्ल्ड’

हिंजवडीत ‘वेलकम टू डार्क वर्ल्ड’

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 17 2018 12:25AMनवनाथ शिंदे

पुणे : परदेशातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडत त्याने अंधासाठी काहीतरी नवीन करण्याचा अट्टाहास धरला होता. त्यासाठी एका मित्राच्या मदतीने हिंजवडीत स्थायिक झाला. अन् सुरू केला अंधांसाठी जगण्याचा प्रयत्न. परदेशातील संकल्पनेवर आधारित, काळोख असणार्‍या उपहारगृहात सर्व्ह करणार्‍या अंध व्यक्तींची जाणीव, देशातील ग्राहकांना व्हावी यासाठी रवीकांत नारायण बट्टड ध्येयवादी युवकाने ‘द ब्लॅक वर्ल्ड इंडिया‘उपहारगृहाची स्थापना केली आहे.

अंधाच्या जीवनात प्रकाश टाकण्यासाठी तसेच त्यांना स्वतःच्या गुणांची जाणीव निर्माण करुन देण्यासाठी परदेशातील संकल्पनेप्रमाणे अंधांकडून चालविण्यात येणार्‍या उपहारगृहाची स्थापना करण्याचे त्याने ठरविले. त्यासाठी जुलै 2017 मध्ये ‘द ब्लॅक वर्ल्ड इंडिया‘ नावाच्या उपहारगृहाची स्थापना केली. हिंजवडीत उभारण्यात आलेल्या या उपहारगृहात कुक (स्वयंपाकी) वगळता अन्नपदार्थ सर्व्ह करणार्‍या चार अंध व्यक्तींना रोजगार देण्यात आला आहे. उपहारगृहात जेवण्यासाठी येणार्‍याला अंध व्यक्तींकडून पदार्थांची वाढ केली जाते.  शुद्ध शाकाहारी असलेल्या या उपहारगृहात 20 लोक बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उपहारगृहाची रचना संपुर्णपणे अंधारयुक्त खोलीत करण्यात आली आहे. अंधांनी अन्नाचे वाटप केल्यानंतर ग्राहकांना खाद्यपदार्थांची चव, स्पर्श, गंधावरुन मेनूची ओळख करावी लागत आहे. द ब्लॅकवर्ल्ड इंडियाच्या या आगळ्यावेगळ्या ‘अंधार्‍या उपहारगृहात’ जेवण करण्यासाठी आणि अंधाची ‘सर्व्हिस’ अनुभवण्यासाठी असंख्य लोक तेथे भेट देत आहेत. 

शहरातील जास्तीत जास्त अंध व्यक्तींना रोजगार उपलब्ध करण्याच्या जिद्दीने रवीने हा नाविण्यपुर्ण उपक्रम सुरु केला आहे. उपहारगृहाबरोबरच अंधव्यक्तींनी बनविलेल्या वस्तुंची विक्री करण्यासाठी उपहारगृहाच्या गॅलरीमध्ये सोय केली आहे. हिंजवडीमधील ‘द ब्लॅक वर्ल्ड इंडिया‘ या राज्यातील पहिल्या वहिल्या अंधव्यक्तींच्या उपहारगृहाच्या सेवेला विशेष मानधन देण्यात येत आहे. उपहारगृहात एका थाळीत सुप, सहा स्टार्टर, मेनकोर्समध्ये चपाती, नान, रोटी, दाल, पनीर मसाला, आईस्क्रिम, गुलाबजाम दिले जाते. अंधांकडून चालविण्यात येणार्‍या उपहारगृहात सुयोग कुलकर्णी, मुकेश उपाध्याय, प्रवीण गोगावणे, फैयाज शेख हे काम करत आहेत. उपहारगृहात खाण्यासाठी येणार्‍या नागरिकांना लाईव्ह म्युझिकचा आनंद देण्यासाठी खास अंध व्यक्तींना आमंत्रित करण्यात येत आहे. त्यामध्ये तबला वादक, बासरीवादक, सनई, बॅण्डवादकांना प्राधान्य दिले जात आहे. जास्तीत जास्त अंध व्यक्तींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी ‘द ब्लॅकवर्ल्ड इंडिया’ उपहारगृहातर्फे प्रयत्न केले जात आहेत.