Fri, Apr 26, 2019 10:13होमपेज › Pune › पिंपरी : ‘बिटकॉईन’मधून एक कोटींचा गंडा 

पिंपरी : ‘बिटकॉईन’मधून एक कोटींचा गंडा 

Published On: Mar 17 2018 1:14AM | Last Updated: Mar 17 2018 12:17AMपिंपरी : प्रतिनिधी

खात्यामधील ‘बिटकॉईन’ची परस्पर विक्री करून एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बिटकॉईन कंपनीच्या संचालकासह सहा जणांविरुद्ध निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

याबाबत भीमसेन बाबूराम आगरवाल (65, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, तर बिटकॉईन कंपनीचे संचालक अमित भारद्वाज, अजय भारद्वाज; तसेच रूपेश सिंग, हेमंत चव्हाण, काका रावडे, हेमंत सूर्यवंशी या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2016 मध्ये भीमसेन आगरवाल यांना एक कोटी रुपयांचे ‘बिटकॉईन’ घेण्यास भाग पाडले. त्यासाठी मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर भीमसेन यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या ‘बिटकॉईन’ची परस्पर ऑनलाईन विक्री केली. ही बाब लक्षात येताच भीमसेन आगरवाल यांनी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली. सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशी करून याबाबत निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास निगडी पोलिस करत आहेत.

‘बिटकॉईनचा काळाधंदा’ या मथळ्याखाली ‘पुढारी’ने भारतात बेकायदेशीरपणे सुरू असलेला ‘बिटकॉईन’, यामध्ये गुंतवणूक करण्यात आलेला काळा पैसा, करचुकवेगिरी, गुन्हेगारांना फायदा ठरत असल्याबाबत सविस्तर वृत्त मालिका प्रसिद्ध केली; तसेच ‘बिटकॉईन’सारख्या देशात अनेक ‘क्रिप्टो करन्सी’ असल्याचे आणि त्यांची नावेही प्रसिद्ध केली. ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल शासनाने घेतली. त्यानंतर याकडे गांभीर्याने पाहत याबाबतची माहिती मागवली.‘बिटकॉईन’मध्ये गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांना नोटिसा पाठवल्या; तसेच त्यांची चौकशी सुरू केली. गुंतवणूकदारांची माहिती मिळवून त्यांना प्राप्तिकर विभागाने नोटिसा बजावल्या; तसेच मुख्य ‘एक्सेंजर’वर छापे टाकण्यात आले. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी देशात ‘बिटकॉईन’ बेकायदेशीर असल्याचे सांगितले. यामुळे 14 लाख रुपयांच्या घरात गेलेला ‘बिटकॉईन’ चार-पाच लाख रुपयांवर आला; तसेच महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी याबाबतचे गुन्हे दाखल झाले.

‘पुढारी’चे वृत्त ठरले खरे...
‘बिटकॉईन’च्या माध्यमातून अनेकांची फसवणूक होत आहे; तसेच महाराष्ट्रात काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. अशाच प्रकारचा एक कोटी रुपयांची ‘बिटकॉईन’च्या माध्यमातून फसवणूक झाली असून, पुणे पोलिसांच्या परिमंडळ तीनच्या हद्दीत एका पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल होणार असल्याचे वृत्त ‘पुढारी’ने एक महिन्यापूर्वी प्रसिद्ध केले होते.