Mon, Apr 22, 2019 15:46होमपेज › Pune › 'बिटकॉईनट' प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला बँकॉकमधून अटक

'बिटकॉईनट' प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला बँकॉकमधून अटक

Published On: Apr 05 2018 2:22PM | Last Updated: Apr 05 2018 2:21PMपिंपरी : प्रतिनिधी

देशासह महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार्‍या ‘बिटकॉईन’ या क्रिप्टो करन्सीमधून हजारो लोकांना कोट्यावधीचा गंडा घालणारा मुख्य सुत्रधार अमित भारद्वाज याला बँकॉक येथून अटक करण्यात आली आहे. केंद्रीय तपास पथकाने अमित आणि त्याच्या भावास अटक केली आहे. आज (गुरुवार दि.०५) तो पुणे पोलिसांच्या ताब्यात मिळण्याची शक्यता आहे. 

‘बिटकॉईन’ एक अभासी चलन, मात्र अल्पावधीतच त्याने दहा-पंधरा हजाराहून थेट पंधरा लाख रुपयांपर्यंत मजल मारली. कमी वेळेत मोठा परतावा आणि मोठी मागणी असल्याने अनेकांनी यामध्ये लाखो, कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली. काहींना आपला काळा पैसा यामध्ये गुंतवला तर काहींना आयकर बुडवण्यासाठी याचा वापर केला. तर काही चोरट्यांनी खंडणी स्विकारण्यासाठी याचा वापर केला. भारतात बेकायदेशीर असलेल्या बिटकॉईनच्या काळ्या धंद्याचा पदार्फाश दै. पुढारीने केला.

‘बिटकॉईन’ म्हणजे काय, ते कश्याप्रकारे सुरु आहे, यातील व्यवहार कसे होतात, यामध्ये काळा पैसा कश्याप्रकारे गुंतवलेला आहे, आयकर बुडवण्याचा प्रकार आहे, तसेच भारतावर झालेल्या सायबर हल्यातही चोरट्यांनी, हल्लेखोरांनी खंडणी बिटकॉईनच्या स्वरुपात मागितली. भारतामध्ये नोटबंदी झाल्यानंतर बिटकॉईनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली. 

यासाठी अनेक ठिकाणी सेमिनार, मिटींग होत होत्या. एजंट गुंतवणूकदार शोधत होते. भारतासह महाराष्ट्र, पुणे शहरातून मोठ्या प्रमाणावर यामध्ये गुंतवणूक असल्याचे दै. पुढारीत प्रसिद्ध करण्यात आले होते.

पुढारीच्या वृत्ताची दखल घेत केंद्रशासनाने यावर चौकशी समिती स्थापन केली. त्यानंतर नागरिकांचे म्हणने मागवले. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणार्‍या मुख्य कंपन्यांना नोटीसा पाठवून खुलासा करण्यास सांगितले. याचसोबत शासनाने बिटकॉईनचे मुख्य एक्सेंजर यांच्यावर बेंगलोर, दिल्ली, पुणे, हिंजवडी परिसरात छापे टाकून गुंतवणूकदारांची नावे मिळवली. यानंतर आयकर विभागाने या गुंतवणूकदारांना नोटीसा बजावल्या. दरम्यान दिल्ली, नागपुर, पुणे, निगडी परिसरात फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल झाले. कोट्यावधी रुपयांची फसवणूक होत असल्याचे समोर आले. 

फसवणूकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर मुख्य सुत्रधार अमित भारद्वाज हा दुबईला पळून गेला. तेथून तो थायलंड मधील बँकॉकमध्ये आला. पुणे पोलिसांनी सायबर पथक भारद्वाजच्या मागावर होते. निगडी आणि दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे आणि सायबर गुन्हे शाखेकडे आलेले शेकडो अर्ज यामध्ये तपास युद्ध पातळीवर सुरु झाला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय तपास यंत्रणाची भारद्वाजचा पकडण्यासाठी मदत घेतली. 

अखेर दोन दिवसांपूर्वी ‘आयबी’च्या पथकाने अमित आणि त्याचा भाऊ विवेक भारद्ाज या दोघांना बँकॉक येथे अटक केली. त्यानंतर त्याला गुरुवारी भारताच्या पोलिसांकडे देण्यात आले. पुणे पोलिसांना आज त्याचा ताबा मिळण्याची शक्यता आहे. भारद्वाज याने कोट्यावधी रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. भारद्वाज हा जरी मुख्य सुत्रधार असला तरी याची व्याप्ती आणखी मोठी आहे. जगातील अनेक देशामध्ये बिटकॉईनचा हा धंदा सुरु आहे. काही देशामध्ये यास मान्यता आहे. याची पाळेमुळे शोधणे भारतीय तपास यंत्रणेपुढे मोठे आव्हान असणार आहे.