Fri, Apr 26, 2019 03:20होमपेज › Pune › कोंबडीचे तोंड, पत्यातील जोकर, उलटे नाव वाढदिवसाला भेट

कोंबडीचे तोंड, पत्यातील जोकर, उलटे नाव वाढदिवसाला भेट

Published On: Apr 14 2018 7:35PM | Last Updated: Apr 14 2018 7:34PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. रक्ताने माखलेले कोंबडीचे तोंड, पत्त्यातील जोकरचे पान आणि तरुणाचे उलट्या दिशेने लिहिलेले नाव असे अनोखे 'गिफ्ट' वाढदिवसानिमित्त तरुणाला पाठवण्यात आले आहे. यामुळे त्या तरूणाचे कुटुंबिय भयभीत झाले असून त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. 

याबाबत जयकुमार भुजबळ (रा. पिंपळे गुरव) याने तक्रार दिली असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयकुमार याचा 10 एप्रिलला वाढदिवस होता. त्याच्या आदल्या दिवशी अज्ञातांनी त्याच्या घरासमोरील अंगणात  एक खोके ठेवले होते. त्या खोक्यात रक्ताने माखलेल कोंबडीचे तोंड, पत्त्यातील जोकरचे पान आणि जयकुमार याचे उलट्या दिशेने लिहिलेले नाव अशा गोष्टी आढळल्या आहेत. 

त्यानंतर 10 एप्रिल रोजी सकाळी भुजबळ कुटुंबीयांच्या गाडीवर जोकर वगळता पत्त्यातील इतर पत्ते फेकण्यात आले होते. तसेच काळ्या रंगापासून झालेली सुरुवात लाल रंगावर संपेल, अशी धमकीही दिली आहे. तसेच डब्याचे फोटो अज्ञाताने 'व्हाय सो सीरियस' या इन्स्टाग्रामवरील फेक अकाऊंटवरुनही शेअर केले आहेत. जयकुमारच्या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो टाकून त्यावर आक्षेपार्ह मजकूर शेअर केला आहे. जयकुमारने चिंचवड, मोहननगर येथील क्लासजवळ मोटार पार्क केली होती. अज्ञाताने मोटारीवर देखील काळा रंग फेकला आणि पुन्हा इन्स्टाग्रामवर फोटो टाकून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या दिवसेंदिवस वाढत जाणा-या प्रकारामुळे भुजबळ कुटुंबीय भयभित झाले आहेत. त्यांनी याबाबात सांगवी आणि पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.