Wed, Apr 24, 2019 19:28होमपेज › Pune › दुचाकींना ‘अ‍ॅन्टी लॉक ब्रेक’ बंधनकारक

दुचाकींना ‘अ‍ॅन्टी लॉक ब्रेक’ बंधनकारक

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 13 2018 12:01AMपुणे : नवनाथ शिंदे

देशातील सर्व दुचाकी वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार प्रत्येक दुचाकीला अ‍ॅन्टी लॉक बे्रकिंग प्रणाली बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अचानक बे्रक दाबल्यास वाहन घसरून अपघात होण्याचे  प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच वेगात प्रवास करणार्‍या  दुचाकीधारकांना अ‍ॅन्टी लॉक ब्रेकिंग प्रणालीचा फायदा होणार आहे. शासनाच्या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 26 लाख दुचाकी धारकांना अ‍ॅन्टी लॉक ब्रेकिंग प्रणाली बसविणे बंधनकारक झाले आहे. 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसेंदिवस वाहन खरेदीचा आलेख वेगाने उंचावत आहे. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण दुचाकींचे आहे. दरम्यान अनेकांकडून वैयक्तिक वाहन खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. नुकत्याच केेंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार 125 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या सर्व दुचाकी वाहनांना अ‍ॅन्टी लॉक ब्रेकिंग प्रणाली आवश्यक असल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

त्यासाठी सर्व दुचाकीधारकांना ही प्रणाली बसविण्यासाठी एक वर्षांची मुदत देण्यात आली आहे. तसेच 1 एप्रिल 2018 पासून बाजारात येणार्‍या प्रत्येक नवीन दुचाकींना अ‍ॅन्टी लॉक बे्रकिंग प्रणाली बसविण्यात येणार आहे. दरम्यान दोन्ही शहरात मिळून जुन्या 26 लाखांवर दुचाकीधारक आहेत. त्यामुळे वर्षंभरात सर्व दुचाकीधारकांना अ‍ॅन्टी लॉक बे्रकिंग प्रणाली बसवावी लागणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून घेतलेल्या निर्णयाचा भुर्दंड दुचाकी वाहनचालकांना सोसावा लागणार आहे. दुचाकीमध्ये अ‍ॅन्टी लॉक ब्रेकिंग प्रणाली बसवून घेण्यासाठी साधारणपणे 5 ते 6 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. 

दंडात्मक कारवाई होणार

दुचाकींमध्ये अ‍ॅन्टी लॉक ब्रेकिंग प्रणाली बसविण्यास टाळाटाळ करणार्‍या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे 125 सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या असलेल्या दुचाकी धारकांना वर्षंभरात 5 ते 6 हजारांचा आर्थिंक मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार 125 पेक्षा जास्त सीसी असलेल्या सर्व दुचाकींमध्ये अ‍ॅन्टी लॉक ब्रेकिंग प्रणाली बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये असणार्‍या सर्व दुचाकीमध्ये प्रणाली बसविणे आवश्यक आहे. जुन्या दुचाकी वाहनधारकांना प्रणाली बसविण्यासाठी वर्षंभराची मुदत देण्यात आली आहे.  - विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी