Sat, Aug 24, 2019 22:21होमपेज › Pune › रक्षाबंधनाला ‘पीएमपी’गोळा करणार 2 कोटींची भाऊबीज

रक्षाबंधनाला ‘पीएमपी’गोळा करणार 2 कोटींची भाऊबीज

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 18 2018 12:41AMपुणे : प्रतिनिधी

शहरात सार्वजनिक वाहतुकीची कमान सांभाळणार्‍या पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएल) रक्षाबंधनाला उत्पन्नाचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. रक्षाबंधनाला शहरातून उपनगरात जाणार्‍या महिला प्रवाशांचे प्रमाण वाढते. त्यामुळे महामंडळाकडून जादा बसेसची सोय करून, सणाच्या तीन ते चार दिवसांत दोन कोटींचे उत्पन्न मिळविण्यासाठी तयारी केली आहे. दरदिवशी उत्पन्नाच्या तुलनेत सण-उत्सावामध्ये प्रवास करणार्‍यांची संख्या दुपटीने वाढते. त्या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांना जलद आणि सक्षमरीत्या सेवा देण्यासाठी महामंडळाने कंबर कसली आहे. 

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने 1 हजार 400 बसेस आणि ठेकेदारांच्या ताब्यातील 600 बसमधून प्रवाशांची दरदिवशी ने-आण केली जाते. दरम्यान सण-उत्सावामध्ये उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाकडून बसेसचे अतिरिक्त नियोजन केले जाते. त्याद्वारे रक्षाबंधनाला जादा प्रवासी ने-आण करण्यासाठी पीएमपीएलच्या उत्पन्नात दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रवास करणार्‍या महिलांमुळे जादा भर पडते. त्या दिवशी प्रवाशांची वाहतूक जास्त असल्यामुळे जादा बसेसची सोय केली जाते. दरवर्षीप्रमाणे महामंडळाने यंदाही जादा बस रस्त्यावर चालविण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. त्यानुसार रक्षाबंधनाला प्रत्येक डेपोद्वारे जास्तीत जास्त बस रस्त्यांवर आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्यानुसार यावर्षी दोन कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडण्याचे उद्दिष्ट असल्याचे पीएमपीएल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

मागील वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीएलच्या तिजोरीत एका दिवसात एक कोटी 97 लाख 19 हजार रुपयांचे उत्पन्न जमा झाले होते. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनाला महामंडळाकडून उत्पन्नाचे उद्दिष्ट दोन कोटींचे निश्‍चित करण्यात आले आहे. रक्षाबंधनाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

अशी राबविली जाणार जादा बसची यंत्रणा

रक्षाबंधनाला सर्व पीएमपीएल बसडेपोंच्या माध्यमातून उपनगरात जाण्यासाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी सकाळपासूनच वाहक, चालक, तिकीट तपासणीस, कंट्रोलर यांना जबाबदार्‍या वाटून देण्यात आल्या आहेत. तसेच ब्रेकडाऊन होणार्‍या बसेस रस्त्यावरून तातडीने हलविण्यासाठी संबंधित विभागाला सूचना करण्यात आली आहे.