Mon, Aug 19, 2019 05:36होमपेज › Pune › ‘भीमसृष्टी’चा चौदा एप्रिलचा मुहूर्त हुकणार ? 

‘भीमसृष्टी’चा चौदा एप्रिलचा मुहूर्त हुकणार ? 

Published On: Feb 26 2018 1:17AM | Last Updated: Feb 26 2018 1:06AMपिंपरी : मिलिंद कांबळे 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ‘भीमसृष्टी’ उभारण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. डॉ. आंबेडकर जयंतीला म्हणजे 14 एप्रिलला या भीमसृष्टीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, दीड महिन्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील 19 प्रसंगांचे म्युरल्स लावण्यात येणार आहे. पुतळ्याच्या दर्शनी भागात 4 व इतर भागात 15 म्युरल्सची रचना आहे. या चार म्युरल्सचा आकार 16.5 बाय 11.5 फूट आणि उर्वरित म्युरल्सचा आकार 12 बाय 7 फूट असा आहे. 

सुरेख व आकर्षक पद्धतीचे म्युरल्स बनविण्याचे काम पुण्यातील कलासंस्कार आर्ट स्टुडिओला देण्यात आले आहे. त्यातील 4 म्युरल्स ब्रांझमध्ये (धातू) घडविण्यात आले आहेत. तर, 12 म्युरल्सचे डिजाईन तयार करून ते मातीमध्ये घडविण्यात आले आहेत. त्यानंतर त्याचा साचा बनवून ब्रांझमध्ये ते तयार केले जातील. म्युरल्स बनविण्याचे कुमात कारागीर व्यस्त आहेत.  

तयार झालेले म्युरल्सच्या प्रतिकृतीचे राज्य शासनाच्या कला संचालनालयाकडून रितसर मान्यता घेण्यात येणार आहे. त्यांच्या नियम व सूचनेनुसारच म्युरल्स तयार केले जात आहेत. कला संचलनालयाच्या सदस्यांना प्रतिकृती दाखवून त्यातील त्रुटी दूर करून दुरुस्ती केली जात आहे. तसेच, येथे माता रमाई यांचाही पुतळा उभारण्यात येणार आहे. परिसराचे सिमाभिंतीचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. तसेच, परिसरात आकर्षक विद्युत प्रकाश व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी तब्बल 2 कोटी 22 लाख खर्च केला जाणार आहे. 

सिमाभिंत सुशोभिकरणाचे काम सुरू असून, त्यावर म्युरल्स लावण्यात येणार आहेत. मात्र, अद्यापपर्यंत एकही म्युरल्स बसविण्यात आलेले नाहीत. या कामाची मुदत एप्रिल 2018पर्यंत आहे. डॉ. आंबेडकर जयंती 14 एप्रिलला असून, त्यापूर्वी हे काम पूर्ण करता येणार नसल्याचे सध्याचा संथ गती कामावरून स्पष्ट होते. भीमसृष्टीचे काम पूर्ण होण्यास किमान 6 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मात्र, काम मुदतीमध्ये एप्रिलपर्यंत पूर्ण केले जाईल, असे पालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कांबळे यांनी सांगितले. या कामाकरीता पुतळा परिसराचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले असून, मागील बाजूने प्रवेश दिला जात आहे.

दरम्यान, पालिकेने स्थापन केलेल्या डॉ. आंबेडकर पुतळा समितीकडून भीमसृष्टीसाठी जीवन प्रसंग निवडण्यासाठी अधिक विलंब झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. समितीने म्युरल्ससाठी जीवनप्रसंग निश्‍चित करून त्यांची शासनाच्या कला संचालनालयाकडून मान्यता घेण्यात आली आहे. या कार्यवाहीत अधिक कालावधी खर्ची पडला आहे. 

जयंतीपूर्वी भीमसृष्टी होणार 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टीसाठी ब्रांझमध्ये तयार झालेले म्युरल्स कला संचालनालयाची मान्यता घेऊन तात्काळ लावले जातील. त्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. भीमसृष्टीसह सुशोभिकरणाचे इतर कामे युद्धपातळीवर पूर्ण केले जातील. डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी सर्व काम पूर्ण होईल, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ  पवार यांनी सांगितले.