Wed, Apr 24, 2019 12:16होमपेज › Pune › कोरेगाव-भीमाप्रकरणी समन्वय समिती

कोरेगाव-भीमाप्रकरणी समन्वय समिती

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 1:33AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

कोरेगाव-भीमा प्रकरणातील गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने आणि समन्वयाने होण्यासाठी पोलिस व दलित संघटनांच्या प्रतिनिधींची 10 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. पुणे ग्रामीण पोलिस आणि दलित संघटनांमध्ये मंगळवारी (दि. 9) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच घटनेला कारणीभूत असणार्यांवर त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी दलित संघटनांनी या बैठकीत केली आहे. 

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ही बैठक बोलाविली होती. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, तसेच आरपीआय, भारिप बहुजन महासंघ, दलित पँथर, बामसेफ, बहुजन समाज पक्ष यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

कोरेगाव-भीमा येथे 1 जानेवारी रोजी झालेल्या प्रकरणानंतर दलित संघटनांची भूमिका समजून घेऊन समाजात सलोखा राखण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासाची दिशा आणि तपास कुठपर्यंत आला आहे याची माहिती या बैठकीत दिली. दलित संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेत विश्वास नांगरे पाटील यांनी या प्रकरणात समन्वय राहावा यासाठी दलित संघटनांच्या प्रतिनिधींची 10 सदस्यांची समिती स्थापन केली जाईल, असे सांगितले. ज्यांना या प्रकरणाबाबत काही सूचना, पुरावे मांडायचे आहेत त्यांनी ते द्यावेत, असेही त्यांनी सांगितले. 

 1 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेला कारणीभूत असणारे मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी दलित संघटनांनी केली. वढू येथे 1 जानेवारीच्या आधी  झालेल्या प्रकाराची माहिती पोलिस प्रशासनाला असताना त्यांनी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली नाही. त्यामुळे हा प्रकार घडला. या प्रकाराला स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी, अतिरिक्त अधीक्षक जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काही जणांनी केली. त्यासोबतच या संदर्भात अनेक मेसेज, व्हिडिओ व्हायरल केले गेले आहेत, त्याचीही तपासणी पोलिसांनी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.