Fri, Aug 23, 2019 23:15होमपेज › Pune › उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी

उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 1:20AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दुर्दैैवी घटनेमध्ये राहुल फटांगळे या मराठा तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला जबाबदार असणार्या व्यक्तीला त्वरित अटक करून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्त करावी, अशी मागणी राहुल फटांगळे याचा मावसभाऊ तेजस धावडे याने पत्रकार परिषदेमध्ये केली.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी (दि. 9) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव, अभयसिंह आडसूळ आणि माधव पाटील उपस्थित होते. या वेळी बोलताना तेजस धावडे म्हणाला की, कोरेगाव भीमा येथे झालेली घटना ही दुर्दैवी असून, त्याची पोलिसांमार्फत कसून चौकशी होणे गरजेचे आहे. राहुल फटांगळे खून व दंगलीमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना न्याय मिळण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी; तसेच बुधवारी (दि. 10) जानेवारी रोजी कोणत्याही प्रकारचा महाराष्ट्र बंद न पाळता राहुलच्या मूळ गावी शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे सकाळी 8 वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शोकसभेला मराठा बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही धावडे याने या वेळी केले.

या वेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बोलताना जाधव म्हणाले की, राहुल फटांगळे याला व्यायामाची आवड होती. त्याची आठवण म्हणून त्याच्या मूळ गावी अथवा सणसवाडी येथे शासनाच्या वतीने व्यायामशाळा उभारून त्याला राहुल फटांगळे याचे नाव देण्यात यावे; तसेच कोरेगाव भीमा व शेजारील सर्व दंगलग्रस्त गावांसोबतच महाराष्ट्र बंदमुळे राज्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात यावे. नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित भरपाई मिळणे आवश्यक असून, त्याला शासनाने ‘टाईम बाँड’ द्यावा. या व्यतिरिक्त राहुल फटांगळे याच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.