होमपेज › Pune › ‘कोरेगाव-भीमा’ हाताळण्यात मुख्यमंत्री अपयशी : चव्हाण

‘कोरेगाव-भीमा’ हाताळण्यात मुख्यमंत्री अपयशी : चव्हाण

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 12:59AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

कोरेगाव-भीमा प्रकरण हाताळणे मुख्यमंत्र्यांना जमले नाही. सध्या परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. यामुळे खरा सूत्रधार शोधणे कठीण होणार असून या प्रकरणात राज्यातील संविधानिक प्रमुख म्हणून मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत, अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केली. 

89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषणाचा इंग्रजीमध्ये अनुवाद केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमासाठी चव्हाण उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजप सरकारवर हल्लाबोल केला. 

चव्हाण म्हणाले, 2014 च्या निवडणुकीचे विश्लेषण केले तर भाजपाला केवळ 30 टक्के मते मिळाली आहेत. 69 टक्के मते भाजपाविरोधात गेली आहे. 69 टक्के मतांच विभाजन झाल्यामुळे मोदींची लॉटरीच लागली. ही मते एकत्र राहिली, मतांचे विभाजन झाले नाही तर, सत्तेत येऊ शकणार नाही, अशी भीती भाजपवाल्यांना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मे 2014 च्या तुलनेत कमी झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

कोरेगाव भीमाच्या प्रकरणामध्ये मुळात दगडफेकीला सुरूवात कोणी केली? जाणूनबुजून हिंसाचार घडावा आणि जातीय तणाव निर्माण व्हावा याचा प्रयत्न केला गेला आहे. समाजात तेढ निर्माण करणार्यांचा उद्देश दोन समाजात धार्मिक, जातीय तेढ निर्माण करण्याचा होता. त्यामुळे यातील मुख्य सूत्रधार शोधण्याची गरज चव्हाण यांनी व्यक्त केली. 

वेगवेगळ्या तपास यंत्रणेमार्फत वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणून त्यांना त्यांच्यासारखे वागण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे चव्हाण म्हणाले. आताचे सामाजिक समीकरण बदलले असून  गुजरातची निवडणूक हे त्याचे उदाहरण आहे.  तेथे दलित समाजावर अत्याचार झाल्यामुळे दलित समाज भाजप सरकारवर नाराज होता. गोहत्या बंदीमुळे संपूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या विचारधारेच्या विरुद्ध गेला आहे. त्यामुळे दलित, मुस्लिम भाजपाविरोधात गेले तर निवडणुका एकतर्फी होऊन जातील, यातून कसा मार्ग कसा काढायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  

महाराष्ट्रातही हीच परिस्थिती असून मुस्लिम समाज, सर्व शेतकरी वर्ग,  व्यापारी, लघुउद्योजक नाराज आहेत. कोणीही सध्या खूश नाही. मोदींच्या आश्वासनाला बळी पडून ज्या तरुणांनी मते दिली ते तरुण आज बेरोजगार आहेत. पंतप्रधान मोदींनी केलेल्या 2 कोटी रोजगार निर्मितीचे काय झाले, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.