Wed, Apr 01, 2020 08:18होमपेज › Pune › 'सहा महिन्यांत पुणेकरांना भामा आसखेडचे पाणी'

'सहा महिन्यांत पुणेकरांना भामा आसखेडचे पाणी'

Last Updated: Feb 27 2020 5:04PM
पुणे : पुढारी वृत्तसेवा

भामा आसखेड प्रकल्प बाधितांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्री अजित पवार, आमदार दिलीप मोहिते -पाटील आणि मी स्वतः योग्य समन्वय साधून प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांना यश मिळत असून भामा आसखेड योजनेचे काम लवकरच सुरू होईल. त्यानंतर काम पूर्ण करून सहा महिन्यात पुणेकरांना पाणी मिळेल, असा विश्वास शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

हडपसर विधानसभा मतदार संघातील विविध प्रलंबीत कामासंबंधी खा. डॉ. कोल्हे यांनी गुरुवारी पुणे महापालिकेत आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीस महापालिका विरोधीपक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक योगेश ससाणे, गफुर पठाण, वैशाली बणकर, हेमलता मगर, आमृता बाबर, नंदा लोणकर, महापालिकेचे वरीष्ठ अधिकारी प्रशांत वाघमारे, राजेंद्र मुठे, प्रवीण गेडाम, अनिरुद्ध पावसकर, व्ही. जी. कुलकर्णी यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

हडपसर मतदार संघातील रस्ते, पाणी, कचरा, कात्रज चौकातील वाहतुकीचा प्रश्न, कोंढवा चौक उड्डाणपूल, कात्रज-कोंढवा रस्ता, रेल्वे अंडरपास पुल ही कामे महिनाभरात मार्गी लावण्याच्या सूचना बैठकीदरम्यान पालिका प्रशासनाला दिल्याचेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले. तिसरी महापालिका झाली तर फायदाच होईल. मात्र, त्यासाठी लागणार्‍या इतर गोष्टींचा विचार होणे गरजेचे, असेही ते म्हणाले.