Wed, Jan 29, 2020 22:46होमपेज › Pune › मोदींना दंगलीतील सहभागाबद्दल पंतप्रधानपद बक्षीस : भाई वैद्य

'मोदींना दंगलीतील सहभागाबद्दल पंतप्रधानपद बक्षीस'

Published On: Dec 02 2017 7:28PM | Last Updated: Dec 02 2017 7:28PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

गुजरातमधील दंगलीतील सहभागाबद्दल नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधानपद बक्षीस दिले आहे. सध्या देशात विकासाच्या नावाखाली सत्ताधारी आणि भांडवलदार हुकुमत गाजवत आहेत. त्यामुळे सरकारी धोरणांचा समाजावर विपरीत परिणाम होत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केले.  

‘हम समाजवादी संस्थाए’तर्फे शनिवारी अखिल भारतीय समाजवादी महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले हाते. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी भाई वैद्य बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, ज्येष्ठ कार्यकर्त्या पुष्पा भावे, सुनिती सु. र., डॉ. मनीषा गुप्ते, रझिया पटेल उपस्थित होत्या.

मेधा पाटकर म्हणाल्या, सामाजिक समस्या, निसर्गाच्या विरोधात जाऊन होणार्‍या विकास प्रकल्पांसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये महिलांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अनेक संघर्षांमध्ये त्या आक्रमक राहिल्या आहेत. महिला जेवढ्या संवेदनशील तेवढ्याच कणखर आणि सहनशील असतात. देशभरात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या घटना पुढे येत असताना महिला शेतकरी यात दिसत नाहीत. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. पण त्यांना त्या आत्मविश्‍वासाची जाणीव करून दिली पाहिजे. धर्म, रूढी परंपरांच्या नावाने होणार्‍या पिळकवणुकीच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी महिलांना जागृत करायला हवे. अन्यायाविरोधात लढण्यासाठी महिलांचा ढाल नव्हे तर तलवार म्हणून वापर झाला पाहिजे,

पुष्पा भावे म्हणाल्या, आज आपण डोक्याला फेटे बांधून बुलेटवर बसून जेव्हा बदलाची भाषा करतो, तेव्हा पुरूषांसारखेच व्हायचे, ही विकृत वृत्ती आपल्यात येते. त्यामुळे मानवीय प्रश्‍नांमध्ये आपण काय भूमिका घेतो हे आपल्या लक्षातच येत नाही. समानतेच्या गप्पा करताना अनेक प्रश्‍नांकडे आपण हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहोत. ज्यावेळी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा महिलांना सुधारायची, आणि मानसिकता बदलायची भाषा केली जाते. मात्र, पुरूषी दृष्टी बदलायला हवी यावर कुणी परिश्रम घेत नाही.