Wed, Apr 24, 2019 21:49होमपेज › Pune › ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

जेष्ठ समाजवादी नेते माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे वयाच्या 88 व्या वर्षी पुण्यात निधन झाले. त्यांना पोटाचा कॅन्सर झाला होता. त्या आजारावर मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज रात्री सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

भाई वैद्य यांचा परिचय

भाईंनी आयुष्यभर समाजवादी विचारांची कास धरली. समाजाच्या तळागाळातील वर्गातून शेकडो कार्यकर्ते तयार केले. त्यांना राजकारणात मोठी पदे मिळावीत यासाठी ते आग्रही राहिले. एस.एम.जोशी, नानासाहेब गोरे, ग.प्र.प्रधान आणि भाई वैद्य ही समाजवादी टीम देशभरात प्रसिद्ध होती. भाईंनी गोवा मुक्ति आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, विविध कामगार चळवळीत भाग घेतला. लढे उभे केले. १९७४ साली ते पुण्याचे महापौर होते. त्याच सुमारास आणिबाणी पुकारण्यात आली होती. त्याविरोधात त्यांनी मोठा मोर्चा काढला. त्यात भाईंना स्थानबद्ध करण्यात आले होते. आणिबाणी संपेपर्यंत ते स्थानबद्ध होते. पुण्याच्या गुरुवार पेठेतून ते महापालिकेवर निवडून आले. आणिबाणी उठल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत (१९७८) ते भवानी मतदार संघातून निवडून आले. त्यांना गृह रिज्य मंत्रीपद देण्यात आले होते. त्यांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी पोलीसांच्या गणवेशात बदल केला. पोलीसांच्या गणवेशात हाफ पँटच्या ऐवजी फूल पँट आली. पुण्याच्या विकासासाठी येथील सर्व समाज घटकांना न्याय मिळावा याकरीता माजी महापौरांनी एकत्र यावे यासाठी भाईंचा सक्रीय सहभाग होता. अलीकडे त्यांनी समाजवादी जनपरिषद हा पक्ष स्थापन केला होता.

माजी पंतप्रधान कै.चंद्रशेखर यांच्या गाजलेल्या भारत यात्रेत भाई हे चंद्रशेखर यांचे सहकारी राहिले. पुण्याजवळ परंदवडी येथे भारतयात्रा केंद्र स्थापन झाले. भाई त्या केंद्राचे अनेक वर्षे संचालक होते. चंद्रशेखर यांच्या खेरीज विश्वनाथ प्रताप सिंग, जॉर्ज फर्नांडिस, मधू लिमये, मधू दंडवते, मोहन धारीया, शरद पवार, बिजू पटनाईक, बापू काळदाते आदी नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध होते.

पुण्याच्या पूर्व भागातून अनेक कार्यकर्त्यांची जडणघडण भाईंनी केली. काँग्रेस, जनता दल आदी पुरोगामी पक्षात भाईंनी तयार केलेले कार्यकर्ते आहेत. त्यांनीच तयार केलेले पांडुरंग तरवडे, दत्ता एकबोटे हे पुण्याचे महापौर झाले.

ज्येष्ठ नेते भाई वैद्य यांना मान्यवरांची श्रद्धांजली

ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी गृहराज्य मंत्री भाई वैद्य यांचे निधन झाले. त्यांना विविध स्तरातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

डॉ. अभिजित वैद्य ः 
मी भाईंचा मुलगा, त्यांच्यावर उपचार करणारा डॉक्टर आणि त्यांच्या विचारांवर नम्रपणे चालणारा शिष्यदेखील आहे. आरोग्य सेनेची स्थापना करताना आयुष्यात त्यांनी कधीही विचारांशी प्रतारणा केली नाही. शारीरिकदृष्ट्या ते शमले असले तरी त्यांचा विचार आम्ही सर्व कार्यकर्ते निश्चितपणे पुढे नेऊ.

प्रकाश जावडेकर (केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री) ः 
भाई वैद्य यांच्या निधनामुळे एक समाजवादी विचारांवर निष्ठा ठेवणारा नेता हरपला. भाई वैद्य आयुष्यभर आपल्या समाजवादी विचारांशी ठाम राहिले आणि शेवटपर्यंत सक्रिय राहिले. रमाबाई आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते करावे, यासाठी पाडव्याच्या दिवशी मी जेव्हा पुण्यात होतो, तेव्हा ते माझ्याकडे आले होते. राष्ट्रपतींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे सांगितल्यानंतर त्यांना आनंद झाला.आणीबाणीविरोधात तुरुंगात आम्ही एकत्र होतो, तेव्हापासून आमचा स्नेह कायम राहिला, असे भार्ईंनी सांगितले. त्यांना विनम्र श्रध्दांजली.

गिरीश बापट (पालकमंत्री) ः 
ज्येष्ठ समाजवादी नेते व मानवतेची मूल्ये जतन करणार्‍या भाई वैद्य यांनी लोकशाही मूल्ये जतन करण्याचे व्रत अंगीकारले होते. स्वातंत्र्यसैनिक, गोवामुक्ती आंदोलनातील नेता, शिक्षण हक्कासाठी सत्याग्रह करणारा पुणेकरांचा मित्र आज गमावला आहे.

बाबा आढाव (ज्येष्ठ कामगार नेते) ः
भाई वैद्य यांच्या जाण्याने मी माझा बालमित्र गमवला आहे. लोकशाही, समाजवादी चळवळीचा मार्गदर्शक नेता आपण गमावला आहे. देशातील लोकशाही समाजवादी चळवळीचे नुकसान झाले आहे.

उल्हास पवार (माजी आमदार) ः
समाजवादावर अविचल निष्ठा असणारा, ती शेवटच्या क्षणापर्यंत जपणारा नेता गेल्याने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीचं कधीही न भरून येणार नुकसान झाल आहे. 

अरुणा ढेरे (ज्येष्ठ कवयित्री) ः
भाईंनी अक्षरशः महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांचे मोहोळ उठवले आहे. एक एक माणूस उभा करणं अवघड असताना त्यांनी हजारो माणसं उभी केली. समाजवादावर पक्की निष्ठा हे त्यांच्या कामाचे आयुष्यभर बळ राहील. अशा माणसांच्या जाण्याने होणारे नुकसान कधीही भरून निघत नाही.

अंकुश काकडे (माजी महापौर) ः 
भाई वैद्य यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचा आधारवड हरपला, निःस्पृह, सतत लोकांसाठी चळवळ करणारा नेता म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख कायम लक्षात राहील.

डॉ. सतीश देसाई ः 
भाई वैद्य यांना मी 1970 सालापासून ओळखतो. नैतिक काम काय असते, हे त्यांनी दाखवलं असून त्यांच्या जाण्याने सर्वसामान्य कार्यकर्त्याला दुःख झाले आहे.

विश्वजीत कदम (काँग्रेस नेते) ः 
भाईंच्या निधनाचे खूप मोठा धक्का बसला. यशवंतराव चव्हाण यांच्या पिढीतील आतापयर्र्ंत हयात असलेले नेते होते. अजूनही त्यांचा आवाज खणखणीत होता. वैचारिकता हरविल्याचा भास होत आहे

योगेश गोगावले (भाजप नेते) 
तत्त्वनिष्ठ राजकारणातील आपल्या विचारसरणीशी प्रामाणिकपणे आयुष्यभर राहणे याचे दुसरे नाव भाई वैद्य. विषयाशी प्रामाणिक राहणे आणि तत्त्वज्ञानाच्या आधारे राजकीय जीवनामध्ये राहणे आवश्यक आहे, हे भाई वैद्यांच्या आजवरच्या आयुष्यातील बोध घेण्याचे तत्त्व आहे.

Tag : bhai vaidy, samjwadi nete, passed away, 


  •