Mon, Jul 15, 2019 23:58होमपेज › Pune › भले बहाद्दर.. आयुक्‍त कोण, यावरही आता ‘बेटिंग’ सुरू!

भले बहाद्दर.. आयुक्‍त कोण, यावरही आता ‘बेटिंग’ सुरू!

Published On: May 01 2018 1:22AM | Last Updated: May 01 2018 1:22AMपुणे : विजय मोरे

शहर आणि उपनगरांत पारंपरिक रमी, तीन पत्ते जुगाराला फाटा देत, जुगारी अड्डेवाल्यांनी नवीन नवीन जुगाराचे प्रकार सुरू केले आहेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाण मांडून हे अड्डेवाले रोज लाखोंची उलाढाल करीत आहेत. विशेष म्हणजे क्रिकेट बेटिंगप्रमाणे गेल्या महिनाभरापासून नवीन पोलिस आयुक्त कधी येणार, कोण येणार, विद्यमान आयुक्त कधी जाणार, यावरही लाखो रुपयांची बेटिंग घेतली जात आहे. शहर आणि उपनगरात मटका अड्ड्यांबरोबरच जुगार्‍यांचेही अनेक अड्डे आहेत. या अड्ड्यांवर साधारणतः तीन पत्ते, रमी, चक्री, काटी (अंदर बाहर) अशा प्रकारचे जुगार खेळले जातात. पिंपरी आणि औंध परिसरात अंदरबाहर हा पत्त्यांचा जुगार खेळला जातो. अतिश्रीमंत व्यापारीच हा जुगार खेळत असल्यामुळे, येथे करोडो रुपयांची उलाढाल होत असते. दोन महिन्यांपूर्वी मुंढवा येथील पॉश जुगारी अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात शहर पोलिसांनी एका पोलिस अधिकार्‍यालाही अटक केली होती.

पोलिस अधिकारी फक्त जुगारच खेळत नाहीत, तर काही निवृत्त अधिकार्‍यांचे स्वतःचे जुगारी क्‍लबही आहेत. जिल्ह्यात नावलौकिक मिळविलेल्या एका अधिकार्‍याने तर खडकी हद्दीत मोठा क्‍लब टाकला होता. एका अति वरिष्ठ अधिकार्‍याला भेटून मी क्‍लब चालविणारच म्हणत त्याने हा क्‍लब सुरू केला होता. दिमतीला काही पोलिस ठेवूनही धंद्याचा आणि खर्चाचा मेळ न बसल्याने त्याला क्‍लब गुंडाळून ठेवावा लागला. काही महिन्यांपूर्वी शहरातील एका बड्या मटकेवाल्याने तर एका वरिष्ठाला, ‘तुमच्या वजनाएवढ्या नोटा हप्त्यापोटी देतो, पण मटका धंदा बंद करू नका’, अशी विनवणी केली होती.शहरातील अनेक मोठ्या जुगारी अड्ड्यांवर ‘ऑनलाईन’ मटका घेतला जातो. यामध्ये क्‍लबमधील दोनशे-तीनशे जुगारी अड्ड्यावरच मटक्याचे आकडे लावतात आणि तेथेच लागलीच पत्त्यांतून तीन पत्ते काढून मटक्याचा आकडा जाहीर केला जातो. लोणावळा, खंडाळा येथील बंगल्यात तर मुंबईचे हिरे व्यापारी शनिवार-रविवार हे दोन दिवस फक्त जुगार खेळण्यासाठीच येतात. फक्त दोन दिवसांसाठी हे व्यापारी पोलिसांना ठोक भावात दोन लाख रुपये हप्ता देतात. येथेही कोटींचा पत्त्यांचा जुगार खेळला जातो.

दरम्यान, शहर आणि उपनगरातील काही पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाण मांडून काही जुगारी अड्डेवाल्यांनी ऑनलाईन जुगार सुरू केला आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने उपनगरातील एका तारांकित हॉटेलमध्ये जाऊन हा जुगार कसा चालतो, याविषयी जाणून घेतले. हे जुगार चालविणार संगणक आणि मोबाईलमधील मास्टर आहेत. त्यांनी स्वतः सिंगापूरमधील एक अ‍ॅप तयार करून ते थेट मोबाईलला लिंक करतात. या अ‍ॅपमध्ये एकूण 12 जुगारी गेम सेटिंग केलेले आहेत. त्यामध्ये पत्ते, मटका, चक्री सारखे जुगार आहेत. जुगार खेळण्यासाठी एक कोड दिला जातो. यामध्ये जुगारीचा आकडा जिंकणार्‍यास पन्नास रुपयास दोनशे रुपये दिले जातात. विशेष म्हणजे हे अ‍ॅप असे सेटिंग केले आहे की, जुगार खेळणार्‍यांपैकी फक्त चार टक्केच जुगारी जिंकू शकतात. 96 टक्के नफाच असतो, असे त्या जुगारी अड्डेवाल्यांनीच हा अड्डा सुरू करण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना सांगितले. शहर आणि उपनगरात सध्या आमचा रोजचा चार लाखांचा धंदा होतो, असेही त्या अड्डेवाल्याने सांगितले.

या जुगारी अड्डेवाल्यांसाठी आयटी क्षेत्रातील तरुणच गिर्‍हाईक असल्याने त्यांनी शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी छोट्याशा जागेत संगणक ठेवून हा जुगार सुरू केला आहे, तर पिंपरी परिसरात क्रिकेट बेटिंगसाठी करोडोची उलाढाल होत असते, तर आयपीएलची मॅच ज्यावेळी असते, तेव्हा लोणावळा-खंडाळा परिसरात मुंबईतील व्यापारी बेटिंग घेत असतात. आजकाल शहर आणि उपनगरात तर वेगळ्याच बेटिंगची जोरदार चर्चा सुरू आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर पोलिस आयुक्त कोण होणार आणि विद्यमान पोलिस आयुक्त कोणत्या तारखेस जाणार यावरही लाखोंची ‘बेटिंग’ घेतली जात आहे.

Tags : Pimpri, betting, Commissioner, election