Mon, Apr 22, 2019 15:41होमपेज › Pune › कठुआ प्रकरणावर हीन प्रतिक्रिया; नोकरी गमावली!

कठुआ प्रकरणावर हीन प्रतिक्रिया; नोकरी गमावली!

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 17 2018 1:52AMमुंबई/नवी दिल्ली ः फेसबुक, ट्विटर सारख्या सामाजिक माध्यमातून आपण एखादा संदेश पाठवत असाल वा भाष्य , प्रतिक्रिया व मत व्यक्त करीत असाल तर त्याला तशी कोणतीही  आडकाठी नाही पण तरीही त्याबाबत अधिक सावध राहिलेले बरे. कारण त्यावरून तुमची नोकरी जाण्याचा धोका उद्भवू शकतो. विविध कंपन्यांचे सीईओ आणि एचआर हेड यांनीच हा धोक्याचा इशारा दिला आहे.

त्याचे प्रत्यंतर अलिकडे येऊ लागले आहे. आठ वर्षाच्या मुलीवरील निर्घूण बलात्कारप्रकरणी अत्यंत हीन स्वरुपाची प्रतिक्रिया फेसबुकच्या वॉलवर टाकणार्‍या केरळमधील एका कर्मचार्‍यास कोटक महिंद्रा बँकेने गेल्या शुक्रवारी कामावरून काढून टाकले. त्याच्या या प्रतिक्रियेवर टीकेची झोड उठली. मात्र बँकेने या कर्मचार्‍याची कामगिरी असमाधानकारक असल्याने त्याला काढल्याचे म्हटले आहे.

सॅमसोेनाईट इंटरनॅशनलचे ग्लोबल सीईओ रमेश तैनवाला यासंबधात म्हणाले, ‘ खाजगी आणि सार्वजनिक संदेश वा प्रतिक्रिया नेमक्या कोणत्या हे ठरवणे सध्या अवघड झाले आहे. कारण सामाजिक माध्यमे त्याच्या सीमारेषेची पुनर्व्याख्या करताना आढळतात. त्यामुळे साहजिकच कंपन्यांच्या व्यवस्थापनावर नवीन जबाबदारी आली आहे व तीअपरिहार्य म्हंटली पाहिजे.

‘कोणती बाब स्वीकारार्ह आहे आणि कोणती नाही, यातील सीमारेषा अगदी पुसट आहे पण कंपनीच्या ध्येयधोरण व एकूण तात्विक बैठकीशी संबंधित प्रतिक्रिया व संदेश विसंगत असता कामा नये. शिवाय तो संवेदनाशून्य आणि द्वेषमूलक असूनही चालणार नाही’, असे  कंपन्या, विशेषतः ग्राहकांशी अधिक जवळून निगडित असणार्‍या कंपन्या सांगतात.

फ्युचर ग्रुपचे या देशातील सर्वात मोठ्या रिटेल, कंपनीचे संस्थापक किशोेर बियाणी यांचे म्हणजे हे की, सामाजिक माध्यमांचे व्यासपीठ झपाट्याने बदलू लागले आहे. त्याचे भान  ठेवून तारतम्याने आपली प्रतिक्रिया नोंदविली पाहिजे तसेच प्रत्येक महत्वाच्या प्रश्‍नाबाबतची आपली संवेदनशीलताही जपणे व त्या पद्धतीने व्यक्त होणे हे तितकेच महत्वाचे आहे. गेल्यावर्षी ‘फेसबुक’ वापरकर्त्याच्या भारतातील संख्येने 24 कोटींचा टप्पा पार केला. एकंदरीत ‘फेसबुक’ ला भारताच्या रूपाने सर्वाधिक वापरकर्ते लाभले. ‘ट्विटर’वर दररोज सक्रीय सहभाग घेणार्‍यांची भारतातील संख्याही लक्षणीय आहे. ही वेगाने वाढणारी बाजारपेठ होऊ पाहत आहे. या माध्यमांचा वाढता वापर होत असल्यामुळे त्याचा कंपनीच्या प्रतिमेवरील परिणामांचा विचारही आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. कंपनीचे उत्पादन वापरणारा सध्याच्या व संभाव्य  ग्राहक उत्पादनावर जर प्रतिकूल मत व्यक्त करू लागला तर ब्रँडच्या प्रतिमेवर आणि विक्रीवर त्याचा वाईट परिणाम होण्याची भीती कंपन्यांना वाटू लागली आहे.

ब्रिटानियाचे व्यवस्थापकीय संचालक वरूण बेरी म्हणतात:‘या माध्यमांचा वाढता परिणाम व त्याची वाढती व्याप्ती लक्षात घेता आपण त्यावर नेमका कोणत्या विषयावरचा संदेश वा प्रतिक्रिया टाकत आहोत, याबाबत सर्व कर्मचार्‍यांनी सध्याच्या युगात तरी सजग असले पाहीजे. प्रत्येक कर्मचारी हा कंपनीचा एक प्रकारचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर असतो. त्यामुळे त्याचे या माध्यमावरील वर्तन हे पूर्ण जबाबदारीचे असले पाहिजे.

कंपनीच्या कर्मचार्‍यासंबधातील कराराच्या अटींमध्ये सामाजिक माध्यमासंबधीचे धोरणही समाविष्ट आहे. पण कंपन्याच्या म्हणण्याप्रमाणे यासंबधीची मार्गदर्शक तत्त्वे अद्याप पुरेशा प्रमाणात विकसित झालेली नाहीत. ती प्रक्रिया पूर्ण झाली तर कंपन्यांची किंवा मालकांची बाजू भक्कम होऊ शकते. एखाद्या कर्मचार्‍याने कंपनीला नापसंत असलेली बाब समजा सामाजिक माध्यमाद्वारे व्यक्त केली तर त्याविरुद्ध कारवाई करणे त्यांना सोपे जाणार आहे.

आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशनच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख संतृप्त मिश्रा यांचा भर कंपनीच्या आचारसंहितेवर आहे. कंपनी व कर्मचार्‍याकडून कशा तर्‍हेचे वर्तन अपेक्षित आहे हे समजण्यासाठी आचारसंहितेत वेळोवेळी योग्य ते बदल करण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. ‘अलीकडील काळात जीवनशैलीचे व वर्तनाचे नवनवे पैलू उलगडताना दिसत असून आचारसंहितेसारख्या मसुद्यातून या नव्या वास्तवतेचे भान प्रतिबिंबित व्हायला हवे’, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की या माध्यमांचा ज्या पद्धतीने वापर होत आहे, त्याचा विचारच न करणे चुकीचे ठरेल. त्यातून जोखीम वाढण्याचा धोका आहे. प्रशिक्षण आणि ‘डूज अँड डोन्ट्स’ बाबत प्रत्यक्ष संवादातून मार्गदर्शन याला प्रोत्साहन द्याला हवे.

अनुचित संदेशाची जबर किंमत

सामाजिक माध्यमांवर तथाकथित बेजबाबदार व आततायी स्वरुपाच्या प्रतिक्रिया टाकल्याबद्दल जगभरात अनेकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. उदाहरणार्थ फेसबुक वर वर्णविद्वेषी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल दोन वर्षापुर्वी बँक ऑफ अमेरिकेच्या एका कर्मचार्‍याला आपल्या नोकरीपासून वंचित व्हावे लागले. एड्सचा संबंध एका वंशाशी जोडणारे ट्वीट केल्याबद्दल इंटरऑक्टिव्ह कॉर्पोरेशन या  इंटरनेट फर्ममधील एका कर्मचार्‍यालाही नोकरी गमवावी लागली. नोकरी शोधू इच्छिणार्‍यांनी तर अधिक सावध रहायला हवे. कारण भरती करणार्‍या कंपन्या उमेदवाराच्या फेसबुक व इतर माध्यमांमधील नोंदींचा मागोवा घेत असतात. ‘पॉझिटिव्ह मूव्हज ’या एक्झिक्युटिव्ह सर्च फर्मचे व्यवस्थापकीय भागीदार विभव धवन यासंबधात म्हणाले , ‘लोक या माध्यमांवर अनेक प्रकारचे पोस्ट्स टाकत असतात. त्यामुळे संबंधित उमेदवाराने अनुचित प्रकारचा संदेश प्रतिक्रिया टाकली आहे की नाही याची बारकाईने पाहणी कंपन्या करीत असतात. अद्याप ही प्रक्रिया पूर्णपणे विकसित झाली नसली तरी भविष्यकाळात ती परिपूर्ण होऊ शकते.‘ गोदरेज इंडस्ट्रीज व संलग्न कंपन्याचे ग्रुप एचआरचे प्रमुख सुमित मिश्रा म्हणतात:‘ कर्मचार्‍याचे आपल्या कंपनीच्या ब्रँडशी जवळचे नाते असायला हवे. एचआर च्या धोरणाचा तो एक भाग आहे. गोदरेजचे सर्व कर्मचारी कंपन्यांचे ब्र्रँड अ‍ॅम्बेसिडर आहेत. व्यक्तीगत व समुहाच्या पातळीवर हे नाते प्रस्थापित व्हायला हवे‘.