Tue, Apr 23, 2019 00:25होमपेज › Pune › पुणे : बौध्द विहारच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : बौध्द विहारच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल 

Published On: May 05 2018 6:22PM | Last Updated: May 05 2018 6:22PMशिक्रापूर : वार्ताहर

शिक्रापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत कोरेगाव-भीमा जातीय तणाव व दंगल प्रकरण झाल्यानंतर सातत्याने कोरेगाव वढू-बुद्रुक व सणसवाडी येथे जातीय तेढ निर्माण होईल, अशा घटना घडत आहेत. या पार्श्वभुमीवर निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायत मालकीच्या शासकीय जागेत बौध्द विहाराचे अनधिकृत बांधकाम पुर्व परवानगी न घेता सुरु केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बाबासाहेब परिबा कांबळे, डॉ. विजय रामदास कांबळे, अशोक भाऊसाहेब कांबळे (रा. निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर) व इतर चार ते पाच जणांवर शासकीय जागेते अतिक्रमण करणे, दमबाजी करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे उपसरपंच कानिफनाथ गव्हाणे यांनी सांगितले. याप्रकरणी निमगाव म्हाळुंगीचे ग्रामविकास आधिकारी बापू गोरे यांनी या बाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

ग्रामपंचायत मालकीच्या शासकीय बखळ जागेत अनधिकृतपणे बौद्ध विहाराच्या इमारतीचे बांधकाम १ मेपासून सुरु करण्यात आले होते. यासाठी कुठलीही पुर्व परवाणगी घेण्यात आलेली नव्‍हती. अनधिकृत बांधकामा संदर्भात ग्रामपंचायतने वेळीवेळी नोटीस बजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु संशयितांनी नोटीस स्विकारली नाही. या उलट दमबाजी करण्यात आली. शिक्रापुरचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी या घटनेचा तपास करत असून सामाजिक सौदार्यहपूर्ण वातावरण सर्वांनी जपण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.