Fri, May 24, 2019 06:25होमपेज › Pune › शहरातील सांस्कृतिक क्षेत्राला हवा आधार

शहरातील सांस्कृतिक क्षेत्राला हवा आधार

Published On: Jun 21 2018 1:23AM | Last Updated: Jun 21 2018 12:17AMपिंपरी ः पूनम पाटील

पिंपरी चिंचवड शहराची सध्या सांस्कृतिक क्षेत्राकडे वाटचाल होत असून संगीताचा प्रवास मात्र दिशाहीन होत आहे.  शहरातील संगीत परंपरेला राजकीय बळ हे शून्य असून त्यामुळे शहरातील सांस्कृतिक क्षेत्राला आता आधाराची गरज आहे, असे मत संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केले आहे. 

पिंपरी चिंचवड शहरात प्रा. रामकृष्ण मोरे हे सांस्कृतिक क्षेत्रासाठी झटत होते.   त्यांना व्हिजन होते. परंतु, हल्ली पैसा सँक्शन करा आणि उडवून टाका असा संगीत महोत्सवाचा प्रवास सुरू झाला आहे. कलौघात संगीत कर्कश होत असून त्याच्यातील गोडवाच नष्ट होत आहे. तसेच, महापालिकेच्या वतीने होणार्‍या संगीत महोत्सवावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात येतो. त्या पैशांचा कुठलाही धरबंध नसतो. हे कुुठेतरी थांबायला हवे यासाठी काही मंडळी प्रयत्न करत आहेत. 

दि.21 जून हा जागतिक संगीत-दिन म्हणून साजरा करण्यात येतो. फ्रान्समध्ये हा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. 1 ऑक्टोबर 1975 रोजी प्रथम आंतरराष्ट्रीय संगीत-दिन म्हणून साजरा करण्यात आला. मात्र, पिंपरी चिंचवड शहरात संगीताचा प्रवास हा दिशाहीन होत असल्याचे चित्र आहे. संगीताचा प्रवास हा महापालिकेच्या मुठभर अधिकार्‍यांच्या हाती सोपवण्यात आला आहे. ज्यांना संगीताची काहीही जाण नाही त्या व्यक्ती आज संगीत महोत्सव आयोजित करत आहेत, अशी टीका जाणकारांनी केली आहे. गेल्या पंधरा वर्षांत कलाक्षेत्राची बाजू मांडणारा कोणी नेता शहराला लाभला नाही. कुणाच्या शब्दाला किंमतही नाही. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्राचा दिशाहिन प्रवास सुरू असल्याची टीका दिग्गजांनी केली आहे. 

काही काळापुरता प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यासारखा द्रष्टा नेता या शहराला लाभला होता. त्यांना सांस्कृतिक तहान होती. शहरात काम करणारे लोक या क्षेत्रातील ज्ञानी आणि गुणी लोक आहेत. अशांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे धोरण त्यांनी अवलंबले होते. ती दूरदृष्टी आता दिसत नाही. त्यामुळे शहराच्या सांस्कृतिक विकासाला मर्यादा पडल्या आहेत. त्यामुळे शहरातील सांस्कृतिक क्षेत्राला आधाराची गरज आहे.    - डॉ. रवींद्र घांगुर्डे,  नादब्रह्म परिवार 

शहरात तज्ज्ञ लोकांची दिवाळखोरी आहे का?

महापालिकेच्या संगीत महोत्सवात भाडोत्री कलाकारांना आणून त्यांच्या हाती कार्यक्रमाची धुरा सोपवण्यात आली. यात स्थानिक कलाकारांना कमी प्राधान्य दिले गेले. शहरात गायकांची दिवाळखोरी आहे हेच यानिमित्ताने महापालिकेच्या अधिकार्‍यांनी व राजकारण्यांनी सिध्द केल्याची तक्रार जुन्या जाणकारांनी केली. नाट्यगृहांची दुरुस्ती करण्याबाबत बाहेरून भाडोत्री गायक समितीत नेमण्यात आली. नाट्यगृहांच्या दुरुस्तीबाबत समितीत गायकांचे काय काम, असा प्रश्‍न इतरांना पडला आहे.