Tue, Jul 23, 2019 11:03होमपेज › Pune › बारामती : व्हॉट्सअॅप कॉलिंगद्वारे झाला घटस्‍फाेट

बारामती : व्हॉट्सअॅप कॉलिंगद्वारे झाला घटस्‍फाेट

Published On: Jan 20 2018 5:36PM | Last Updated: Jan 20 2018 5:59PMबारामती : प्रतिनिधी

व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हिडिओ कॉलिंगचा आधार घेत जर्मनीत असलेल्याशी संपर्क साधत बारामतीच्या न्यायालयाने घटस्फोटाचा निकाल दिला. बारामती न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. त्या माध्यमातून एका उच्चशिक्षित जोडप्याच्या घटस्फोटाबाबतचा निर्णय घेण्यात आला. वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश महेंद्र बडे यांनी हा निकाल दिला. 

उच्चशिक्षित जोडप्यामधील पती सध्या नोकरीनिमित्त जर्मनीत आहे; परंतु या जोडप्याने परस्पर संमतीने बारामतीच्या न्यायालयात 27 जून 2017 रोजी घटस्फोटासंबंधीचा अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल करतेवेळी पतीला जर्मनीत नोकरीसाठी जाण्याची घाई होती; त्यामुळे जर्मनीहून पुन्हा बारामतीच्या न्यायालयात उपस्थित राहण्यास अडचण उद्भवणार होती. परस्पर सहमतीने घेण्यात येणार्‍या घटस्फोट प्रकणातील सहा महिन्यांचा कालावधी माफ होऊन लागलीच सुनावणी व्हावी, अशी मागणी या जोडप्याने न्यायालयाला केली; परंतु हा कालावधी माफ करणे योग्य होणार नसल्याचे मत न्यायालयाने नोंदवत या कालावधीनंतरच सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार जानेवारीमध्ये या प्रकरणाची सुनावणी न्यायालयापुढे झाली.

निर्धारित तारखेला पत्नी न्यायालयात उपस्थित राहिली; परंतु तिचा पती बेल्जियम (जर्मनी) येथेे नोकरीनिमित्त कार्यरत असल्याने त्यांना भारतात येणे शक्य नव्हते. या परिस्थितीत न्यायालयापुढे अडचण निर्माण झाली होती. या खटल्यात काम पाहणार्‍या अ‍ॅड. प्रसाद खारतुडे यांनी स्काईपचा वापर करून व्हिडीओ कॉलद्वारे पतीचा जबाब घेण्याची परवानगी न्यायालयाला मागितली. न्यायालयाने ती मान्य करत पत्नीला पतीस स्काईपद्वारे कॉल करण्यास परवानगी दिली; परंतु तांत्रिक अडचणींमुळे स्काईप कॉल जोडला जाऊ शकला नाही.

त्यामुळे पुन्हा व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्याची परवानगी न्यायालयाकडून घेऊन संपर्क साधण्यात आला. पती-पत्नीची ओळख पटविण्यात आली.  न्यायाधीशांनी संबंधित खटल्यातील पतीला सध्या कुठे आहात, न्यायालयात हजर का राहिला नाहीत याबाबत विचारणा केली. शिवाय पुन्हा एकत्र येऊन संसार करण्याची शक्यताही तपासून पाहिली. समुपदेशाने काही मार्ग निघतो का, याचीही चाचपणी केली;  परंतु पतीने नोकरीमुळे भारतात येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे परस्पर सहमतीने घटस्फोटाच्या निर्णयावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. या खटल्याचे कामकाज अ‍ॅड. प्रसाद खारतुडे व अ‍ॅड. प्रीती शिंदे यांनी पाहिले.