Fri, May 24, 2019 08:27होमपेज › Pune › दोन दुचाकींची धडक : २ ठार

दोन दुचाकींची धडक : २ ठार

Published On: May 29 2018 3:35PM | Last Updated: May 29 2018 3:35PMबारामती : प्रतिनिधी

बारामती-निरा रस्त्यावर कोरहाळे बुद्रूक येथे दोन दुचाकींचा अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघेही ठार झाले, तर एक ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला.  शेखर जनार्दन थोपटे (वय ४२, रा. थोपटेवाडी, ता. बारामती) व हनुमंत दिनकर येळे (वय ४७, रा. मोराळवाडी, ता. बारामती) अशी अपघातात ठार झालेल्या व्यक्तिंची नावे आहेत. यश चंद्रकांत मेमाणे (रा. पारगाव मेमाणे, ता. पुरंदर, सध्या रा- भिवंडी, ठाणे) हा या अपघातात जखमी झाला. हनुमंत येळे यांच्या मित्राचा तो मुलगा आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त तो त्यांच्याकडे आला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून, बारामतीतील खासगी रुग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. सोमवारी (दि. २८) रात्री सव्वा आठच्या सुमारास करहाळ्यातील १५ फाट्याजवळ ही घटना घडली. 

सोमवारी रात्री प्रचंड वादळी वारे व वीजांचा कडकडाट सुरु होता. त्यामुळे घरी जाण्याच्या घाईतून हा अपघात घडला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात नितीन जनार्दन थोपटे यांनी फिर्याद दाखल केली. अपघाताची खबर मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पाटील व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी बारामतीला हलविले. येथील खासगी रुग्णालयात थोपटे व येळे यांना दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.