Sun, Jul 05, 2020 04:15होमपेज › Pune › बारामतीतील बॉण्डच्या टोळीवर मोक्का

बारामतीतील बॉण्डच्या टोळीवर मोक्का

Published On: Jun 13 2019 2:42PM | Last Updated: Jun 13 2019 2:42PM
बारामती : प्रतिनिधी

व्यापाऱ्यांकडून खंडणी घेणाऱ्या बारामतीतील बॉण्ड टोळीतील तिघांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी ही माहिती दिली. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यावेळी उपस्थित होते.

मोक्काअतंर्गत कारवाई झालेल्यांमध्ये टोळीचा प्रमुख संतोष उर्फ बॉण्ड दत्तात्रय अडागळे (वय १९), विशाल आप्पा मांढरे (वय १९) व गणेश सत्यवान लांडगे (वय २०, तिघेही रा. तांदूळवाडी, बारामती) यांचा समावेश आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील छोट्या व्यापाऱ्यांकडून ही टोळी खंडणी वसूल करत होती. आकाश किसन पाळेकर (रा. पारवडी, ता. बारामती) या आईसक्रीम स्टॉल विक्रेत्याच्या फिर्य़ादीवरून पोलिसांनी या टोळीतील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. फिर्यादीच्या आईसक्रीम स्‍टॉलवर येत खंडणी मागणे खंडणी न दिल्याने फिर्यादीला कोयत्याने मारण्याचा प्रयत्‍न करणे जाताना त्याच्याकडील आईसक्रीमचे दोन बॉक्‍स तसेच गल्ल्यातील रोख रक्कमही आरोपींनी नेली होती. 

त्यांच्या विरोधात यापूर्वी तालुका पोलिस ठाण्यात दरोडा, सरकारी कामकाजात अडथळा आणणे, सरकारी कर्मचार्‍याला मारहाण करणे, जबरी चोरी, मारहाण असे सहा गुन्हे दाखल आहेत. 
त्यामुळे या टोळीविरोधात तालुका पोलिसांकडून मोक्काचा प्रस्ताव घेत उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांनी तो जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर अधिक्षक जयंत मिना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस महासंचालके डॉ. सुहास वारके यांच्याकडे प्रस्‍ताव दाखल केला होता. मंगळवारी (दि. ११) रोजी या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. 

पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्यासह हवालदार सुरेश भोई, भानुदास बंडगर, राजेंद्र जाधव, अजिनाथ बनसोडे, सारीका जाधव, पोपट कवितके, नंदू जाधव, ह्रदयनाथ देवकर यांनी ही कामगिरी केली. तालुका पोलिसांनी आजवर तीन टोळ्यांतील २९ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली असून, काही तडीपारीचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले. या पथकाला जिल्हा पोलिस अधिक्षकांनी १५ हजारांचे बक्षिस जाहीर केले आहे. 

बारामती उपविभागात नऊ टोळ्यांना मोक्का

गेल्या वर्षभरापासून बारामती उपविभागात गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी मोक्कातंर्गत कारवाईचे सत्र सुरु केले आहे. आजवर नऊ टोळ्यातील ७६ आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे.
नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती