Fri, Jul 19, 2019 00:53होमपेज › Pune › 27 जूनपर्यंत पोलिस कोठडी

‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या अध्यक्षांसह ६ जणांना अटक

Published On: Jun 20 2018 1:25PM | Last Updated: Jun 20 2018 3:04PMपुणे : प्रतिनिधी 

डीएसके  यांच्या ड्रीम सिटी या प्रोजेक्टसाठी नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष व  व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांच्यासह बँकेचे चार आधिकारी आणि डीएसकेंचे लेखापरीक्षक व मुख्य अभियंत्याला बुधवारी अटक केली. डीएसकेंना 100 कोटींचे कर्ज मंजूर करून त्यापैकी 80 कोटी रुपयांचे कर्ज संगनमत करून वितरित केले होते. चौघांना न्यायालयात हजर केले असता न्या. आर. एन. सरदेसाईंनी त्यांना 27 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभाकर मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्र कुमार वेदप्रकाश गुप्ता, डीएसके लेखापरीक्षक सुनील मधुकर घाटपांडे, डीएसके डेव्हलपर्सचे मुख्य अभियंता राजीव दुल्लभदास नेवासकर अशी  अटक करण्यात आलेल्या अधिकार्‍यांची नावे आहेत.  तर, बँकेचे माजी अध्यक्ष सुशील मुहनोत आणि विभागीय व्यवस्थापक नित्यानंद सदाशिव देशपांडे या दोघांनाही अनुक्रमे जयपूर, अहमदाबादहून ताब्यात घेण्यात आले आहे. 

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी दीपक सखाराम कुलकर्णी, पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासह आतापर्यंत पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. डीएसके यांनी जवळपास सहा हजार गुतंवणूकदारांची फसवणूक केल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. त्यानुसार 2 हजार 43 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याच्या तपासकरून पंधरा दिवसांपूर्वी न्यायालयात 4 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. 
 डीएसके यांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केल्या आहेत.

या कंपन्यांच्या नावावर वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या नावावर बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्यानुसार पोलिसांकडून सरकारी लेखापरीक्षक तसेच कायदे तज्ज्ञांकडून कर्जाबाबत तपास केला जात आहे. त्यावेळी  बँक ऑफ महाराष्ट्रकडून डीएसके यांनी त्यांच्या ड्रीमसिटी या प्रोजेक्टसाठी 100 कोटी रुपयांचे कर्जासाठी मागणी केली होती. त्यावेळी डीएसकेंना कर्ज देताना बँकेच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला. तसेच, संगणमताने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकातील  नियम डावलले व मार्गदर्शक सूचना न पाळता त्यांना तत्काळ 50 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर 10 आणि 20 कोटी असे दोन वेळा कर्ज दिले. एकूण 80 कोटी कर्ज वितरित केल्याचे समोर  आले.

याप्रकरणासंदर्भात  आर्थिक गुन्हे शाखेने प्रथम पुण्यातून बँकेचे अध्यक्ष रविंद्र मराठे, राजेंद्र गुप्ता, सुनील घाटपांडे, राजीव नेवासकर यांना बुधवारी चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर त्यांना सायंकाळी अटक करण्यात आली. तसेच, बँकेचे माजी अध्यक्ष सुशील मुहनोत यांना जयपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तर, नित्यानंद देशपांडे अहमदाबाद येथून ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

बँक ऑफ महाराष्ट्रचे निवेदन

डी.एस.के. डेव्हलपर्स प्रा. लि. यांजकडून बँक ऑफ महाराष्ट्रची एकूण थकबाकी रु.94.52 कोटी असून त्यासाठी प्राथमिक आणि अतिरिक्त तारण बँकेकडे आहे. सरफेसी कायद्याअंतर्गतच्या वसूलीसाठी आवश्यक त्या उपाययोजना बँकेने यापूर्वीच केल्या असून त्यापैकी काही मालमत्तांच्या विक्रीची प्रक्रियाही सुरु आहे. डी.एस.के. डेवलपर्स आणि त्याचे प्रवर्तक यांना बँकेने याआधीच विलफुल डिफॉल्टर घोषित केले आहे. डी.एस.के. यांना दिलेली कर्जे ही बँकेच्या कर्जविषयक धोरणांना अनुसरुन आहेत.

देशातील पहिलीच घटना

देशाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्ष आणि बड्या अधिकार्‍यांना पदाचा गैरवापर करून कर्ज दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यापूर्वी 1957 मध्ये एलआयसीच्या चेअरमनना अटक करण्यात आली होती, असे यावेळी पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.