Thu, Apr 25, 2019 08:11होमपेज › Pune › गंधर्वसूर अजूनही लोक विसरले नाही : कीर्ती शिलेदार

गंधर्वसूर अजूनही लोक विसरले नाही : शिलेदार

Published On: Jun 28 2018 8:06PM | Last Updated: Jun 28 2018 8:06PM  बालगंधर्व पुरस्कार सोहळा ऑर्गनवादक चंद्रशेखर देशपांडे यांना प्रदान

पुणे : प्रतिनिधी

नटसम्राट बालगंधर्व यांच्या काळात रंगभूमीने सुवर्णयुग पाहिले. मराठी नाटकाला भाषा, प्रांत भेदून त्याच्या पलीकडे त्यांनी नेले. बंगाली, तामीळ नाट्यप्रेमी मंडळी गंधर्व संगीताने वेडी झाली. गंधर्व संगीताचा परिणाम इतका झाला की, त्याकाळी चित्रपटसुद्धा म्युझिकल झाले. बालगंधर्वंच्या संगीताचा त्यांच्यावर प्रभाव पडला. यावरून गंधर्वसूर अजूनही लोक विसरले नाही हे जाणवते, असे मत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केले.

पुणे महानगरपालिकेतर्फे बालगंधर्व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महापौर मुक्ता टिळक, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, नगरसेविका नीलिमा खाडे उपस्थित होत्या. कार्यक्रमात बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त ऑर्गनवादक चंद्रशेखर देशपांडे यांना बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच, पौर्णिमा धुमाळ (गायन), दत्ता गाडेकर (नेपथ्य निर्मिती), डॉ. राम साठ्ये (संगीतनाट्य कलावंत), अनिल टाकळकर (प्रकाश योजनाकार), ऋषी मनोहर (उत्कृष्ट दिग्दर्शक, पुरुषोत्तम करंडक स्पर्धा) यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चंद्रशेखर देशपांडे म्हणाले, मी अतिशय भाग्यवान आहे. मला लहानपणापासून बालगंधर्व यांचा सहवास लाभला. मला संगीत रंगभूमीची सेवा करायला मिळाली. मी आज पूर्णपणे समाधानी आहे. माझ्या वाटचालीत माझे वडील, माझी पत्नी, माझे शिष्य, बालगंधर्व गायकी याचा वाटा आहे.

मुक्ता टिळक म्हणाल्या, बालगंधर्व रंगमंदिर उभारताना बालगंधर्व यांनी त्याची पायाभरणी केली. या रंगमंदिरामध्ये संगीत नाट्य सादर झाल्याने हा एक महत्त्वाचा ठेवा आहे. नाटकाला रंगमंचापर्यंत पोहोचवायचे असल्यास संगीत, नेपथ्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.