Thu, May 23, 2019 04:31होमपेज › Pune › भाजपचा खड्डे दुरूस्तीचा दावा ‘खड्ड्यांत’

भाजपचा खड्डे दुरूस्तीचा दावा ‘खड्ड्यांत’

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 10:35PMपिंपरी : जयंत जाधव

पिंपरी-चिंचवड शहरात पावसाळ्यात झालेल्या एक-दोन मुसळधार पावसानेच रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनसेने महापालिकेत आयुक्त दालनासमोर गुरुवारी (दि. 12) धरणे आंदोलन केले. त्यामुळे महापौर नितीन काळजे यांनी दोन दिवसात खड्डे बुजविण्याचे आदेश स्थापत्य विभागाला दिले. तर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी 15 दिवसांत शहर खड्डे मुक्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यावर सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शहरात खड्डे बुजविण्याचे काम वेगात सुरु असल्याचा दावा केला. परंतु; प्रत्यक्षात शहरात खड्डे मोठ्या प्रमाणात दिसून येत असून खड्डे बुजविण्याचे कामही वेगात सुरु असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे भाजपला दीड वर्षात  पावसाळ्यात दर्जेदार रस्ते देण्यात अपयश आले आहे.     

शहरात एकूण 4 हजार 59 खड्डे पडले असून, आतापर्यंत 3 हजार 375 खड्डे बुजविण्यात आले आहेत. तर, पावसाने उसंत दिल्यानंतर उर्वरित खड्डे तातडीने दुरूस्त केले जातील, असा दावा पालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सोमवारी (दि.16) पत्रकारांशी बालताना केला होता. परंतु; हा दावा पुर्णपणे खोटा ठरला आहे.  ‘रस्त्यावरील खड्डे न बुजविल्याने संताप; शहरातील सर्वच रस्त्यावरील खड्डे कायम; महापौरांची ‘डेडलाईन’ संपली’ या शीर्षकाखाली ‘पुढारी’ने सोमवारी (दि. 16) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पवार यांनी सोमवारी तातडीने सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन रस्ते दुरूस्तीचे काम करण्याच्या सूचना दिल्या. परंतु; निर्ढावलेल्या स्थापत्य विभागाकडून एकतर वेगाने काम होत नाही आणि त्यात झालेच तर रस्त्यांवरील खड्डयांमध्ये फक्त मुरुम टाकला जातो. 

दत्ता साने यांनी खड्डयांना  भाजप जबाबदार असल्याची टीका केली आहे. तर, हे खड्डे राष्ट्रवादीच्या काळात झालेल्या रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे ते काम सुमार दर्जाचे होते हे समोर आले आहे, असा आरोप करून पवार म्हणाले, वाहनचालकांना त्रास होऊ नये म्हणून शहरातील खड्डे तातडीने बुजविले जात आहेत. एकूण 2 हजार 252 खड्डे बीएम, बीबीएम आणि कोल्ड मिक्सने बुजविले आहेत. पेव्हींग ब्लॉकद्वारे 15 ठिकाणी दुरूस्ती केली आहे. जेसीबी आणि मुरूमने 1 हजार 9 ठिकाणचे खड्डे बुजविले आहेत. ‘जेट पॅचर’ मशिनने एकूण 99 ठिकाणचे खड्डे दुरूस्त करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 83 टक्के काम पूर्ण झाले असून, हे काम वेगात सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

पालिकेच्या सर्व कनिष्ठ अभियंत्यांनी शनिवारी (दि.13) व रविवारी (दि.14) खड्डे शोधून काढले आहेत. त्यातून ही संख्या निश्‍चित केल्याचा दावा पवार यांनी केला होता. शहरातील खड्डे सोडा पालिकेच्या मुख्य इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खराळवाडीच्या अलीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागे मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पवार यांना पालिकेजवळील रस्त्यांची तरी दुरवस्था दिसते की नाही, हा प्रश्‍न सामान्यांना पडणे सहाजिकच आहे. तर; दत्ता साने यांनी एकट्या चिखलीतील एखाद्या रस्त्यावरच 350 खड्डे आहेत, असा पलटवार पवार यांच्यावर केला आहे. त्यात तथ्य आहे. त्यामुळे पारदर्शक कारभाराच्या घोषणा करुन सत्तेत आलेल्या भाजपने जनतेची राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षाही घोर निराशा केली आहे.      

रस्ते दुरुस्ती दिसतेय कुठे?

रस्ते दुरूस्तीचे काम वेगात सुरू असल्याचा दावा भाजपसह पालिका प्रशासन करीत आहे. मात्र, शहरात हे काम  मोठ्या प्रमाणात तर दूर किरकोळ कामेही सुरू असल्याचे दिसत नाही. सोमवारी व मंगळवारी सकाळपासूनच पाऊस असल्याने कामच करता येत नव्हते. उलटपक्षी पावसामुळे नवे खड्डे तयार होत आहेत.

टक्केवारीमुळे दर्जाकडे दुर्लक्ष

हॉटमिक्स पध्दतीने रस्ते बनविताना डांबर किती टाकायचे याचे नियम आहेत. परंतु; हे नियम पायदळी तुडवून ठेकेदार कमी डांबर वापरून रस्त्यांची मलमपट्टी करतात व पालिकेकडून कोट्यवधी रुपयांची बिले उकळतात. अधिकारी, स्थायी समिती व स्थानिक नगरसेवक यांना टक्केवारी दिल्यामुळे रस्त्यांच्या दर्जाकडे सर्वच जण दुर्लक्ष करतात. राष्ट्रवादीच्या काळात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे याकडे बारकाईने लक्ष असायचे. पावसाळ्यापूर्वी बैठक घेऊन आयुक्तांसह ते सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांनाही कडक सूचना देत. यावेळीही भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांना पत्र देऊन पावसाळ्यापूर्वीची कामे करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु; अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.