Sat, Jul 20, 2019 21:17होमपेज › Pune › सुरक्षाकठडे अन् दरडींचा धोका

सुरक्षाकठडे अन् दरडींचा धोका

Published On: Aug 02 2018 2:00AM | Last Updated: Aug 02 2018 1:18AMधनकवडी : बाजीराव गायकवाड

वाढत्या वाहनांच्या संख्येच्या मानाने नवीन कात्रज बोगदा तयार करून देखील  जुन्या कात्रज घाटरस्त्याचे महत्त्व कमी झाले नाही. मध्यंतरीच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या बाजूच्या नाल्यात टाकण्यात आलेला राडारोडा, ढासळलेल्या दरडी, सुरक्षेसाठी बांधण्यात आलेले कठडे यामुळे हा रस्ता धोकादायक झाला असून या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

कात्रज घाटातील स्थिती
कात्रज बोगदा हा सहा किलोमीटरचा घाटरस्ता असून निर्जन असा असल्याने नवीन बोगद्याच्या मानाने या रस्त्यावर वाहतूक कमी प्रमाणात आहे. अशा वेळी अपघात होण्याची शक्यता कमी आहे. आत्महत्या, खून, फॉरेस्ट पार्ट्या अशा घटना घाट परिसरात झाल्याचे निर्दशनास आले आहे. या पार्श्‍वभूमीवर घाटात पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र पोलिस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अथवा मर्यादित कर्मचारी संख्येमुळे ते बंद अवस्थेत दिसत आहे. घाट परिसर डोंगर उतार व विस्तीर्ण वनक्षेत्राचा असल्यामुळे मोबाईल फोनला नेटवर्क नसते. अशावेळी पोलिस मदत केंद्राची गरज आहे.
  रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग, नाल्यात अनेक ठिकाणी पडलेला राडारोडा यामुळे पावसाळी पाण्यासह कचरा रस्त्यावर येऊन वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे. पोलिस मदत केंद्रालगत चार-पाच ट्रक राडारेाडा पडलेला आहे. चार-पाच ठिकाणी दरडी कोसळ्याने तातडीने ते हटविणे आवश्यक आहे. बोगद्यामध्ये दोन्ही बाजूंना गटारातील काढलेल्या गाळाचे ढीग तसेच पडले आहेत. रात्रीच्या वेळी अनेकदा दुचाकी वाहनांना कडेने जाताना या पडलेल्या राडारोड्यामुळे  त्याचा अडथळा होऊन अपघात होण्याची शक्यता  आहे. वाहनचालकांनी  या बोगद्यात विजेचे दिवे लावण्याची मागणी केली आहे. या घाटरस्त्यावर अनेक लहानमोठ्या अपघातांची संख्या मोठी असून निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता निधी उपलब्ध झाल्यावर काम करू असे ठरावीक साच्याचे उत्तर ऐकायला मिळते. 

सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
राष्ट्रीय महामार्गाकडून राज्य महामार्ग सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाकडे देखभाल करण्याचे काम करीत आहे. लाखो रुपये निधीची उधळपट्टी करूनही या घाटरस्त्याच्या समस्या जैसे की तैसे अशाच असल्याचे दिसते. वाहनांच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेले कठडे तुटलेले आहेत, चार-पाच ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत, रस्त्याच्या मध्यभागी व रस्त्याच्या दुतर्फा नसलेले पांढरे पट्टे, रोडसाईड ब्लिंकर्स, दिशादर्शक फलक या अनेक बाबींकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. या अनेक बाबींची पूर्तता होणे आवश्यक असल्याचे वाहनचालकांनी गितले.