होमपेज › Pune › वैद्यकीय विभागाने मांडला नागरिकांच्या जिवाशी खेळ

वैद्यकीय विभागाने मांडला नागरिकांच्या जिवाशी खेळ

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 21 2017 1:15AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

महापालिकेच्या मध्यवर्ती औषधी भांडार विभागाकडून खरेदी केलेल्या औषधांचे नमुने तपासणी न करता त्या औषधांचा वापर रुग्णालये व दवाखान्यांत होऊ लागला आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाने नागरिकांच्या जिवाशी खेळ मांडल्याचे उघड झाले आहे. राज्य शासनाच्या स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागाने औषधांची बॅचनुसार तपासणी करून ही औषधे वापरण्यास योग्य असल्याचा अहवाल प्राप्त करूनच वापर करणे बंधनकारक असल्याच्या दिलेल्या आदेशाचा वैद्यकीय विभागाला विसर पडला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका रुग्णालयांत व दवाखान्यांसाठी वर्षाला सुमारे 20 कोटी रुपयांची तरतूद औषध खरेदीसाठी करण्यात आली. त्यानुसार मध्यवर्ती औषध  भांडार विभागाकडून विविध औषधे खरेदी करण्यात येत आहेत.  तांत्रिक अर्हताधारक आणि प्राधिकृत अधिकार्‍यांकडून औषधांचे नमुने तपासणी करणे, त्याचबरोबर तपासणी अहवाल प्राप्त करून घेतल्यानंतरच औषधांचा वापर करणे बंधनकारक आहे. 

महापालिकेच्या मध्यवर्ती औषध भांडार विभागाकडून सन 2011-12 मध्ये औषधे खरेदी करण्यात आली. त्या औषधांचे तपासणी अहवाल, औषधाचे नाव, खरेदी संख्या, बॅच नंबर, औषधांचा नमुना, तपासणीसाठी पाठविलेली माहिती, औषधांचा तपासणी अहवाल प्राप्त करून घेतल्याची माहिती, तपासणी अहवालाबाबत केलेल्या पत्रव्यवहारांच्या प्रती, आदी माहिती वैद्यकीय विभागाने लेखापरीक्षणास उपलब्ध करून दिली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लेखापरीक्षण पथकाने वैद्यकीय विभागाने खरेदी केलेली औषधे बॅचनुसार तपासणी झाल्याची खात्री देता येत नाही, असा गंभीर आक्षेप नोंदविला होता; औषधांची बॅचनुसार तपासणी करूनच औषधे वापरण्यास योग्य असल्याचा अहवाल प्राप्त करून औषधांचा वापर करण्यात यावा, अशाही सूचना वैद्यकीय विभागास दिलेल्या होत्या. याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.