Sat, Jul 20, 2019 22:00होमपेज › Pune › दाम्पत्याशी जवळीक साधत  आठ महिन्याच्या बाळाचे अपहरण

दाम्पत्याशी जवळीक साधत  आठ महिन्याच्या बाळाचे अपहरण

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 12:41AMपुणे : प्रतिनिधी 

काम न मिळाल्याने पुण्यातून परत जाण्यासाठी निघालेल्या दाम्पत्याशी अनोळखी महिलेने भावनिकपणे जवळीक साधत जेवण व कपडे दिले. त्यानंतर जेवण्यासाठी पाठवून मुल सांभाळण्याच्या बहाण्याने आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण केल्याची घटना पुणे रेल्वे स्थानक परिसरात  बुधवारी  उघडकीस आली. याप्रकरणी बाळाच्या आईने पुणे रेल्वे स्टेशन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दाम्पत्य अक्कलकोट येथील राहणारे आहे. त्यांना आठ महिन्यांची मुलगी आहे. त्यांच्या आठ महिन्यांच्या मुलीसह पुण्यात कामाच्या शोधात ते सोमवारी सकाळी आले. मात्र कामाचा शोध घेऊनही त्यांना काही काम न मिळल्याने ते परत त्यांच्या गावी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांना अनोळखी महिला भेटली. त्या महिलेने त्यांच्या मुलीसाठी कपडे खरेदी करून दिले. तसेच त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या जवळीक साधत तिने  तरुणाला फोन करून बोलवून घेतले. त्याला दोघांनाही जेवण्यासाठी नेण्यास सांगितले. तुम्ही जेवण करून या तोवर मी बाळ सांभाळते असे म्हणून महिला पुणे स्टेशनजवळील दर्ग्याजवळ थांबली. ते दर्ग्याजवळच तरुणासह जेवण्यासाठी गेले. तरुणाने त्यांना जेवण्यास सांगून बाहेर जाऊन येतो असे सांगितले. जेवून परत आल्यानंतर महिला मुलीसह तेथून पसार झालेली होती. तर तो तरुणही पसार झाला होता. त्यानंतर महिलेने  रेल्वे स्टेशन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असून पुढील तपास रेल्वे पोलिस करत आहेत.