Tue, Sep 25, 2018 12:30होमपेज › Pune › पोलिसाच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न

पोलिसाच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न

Published On: Aug 14 2018 1:35AM | Last Updated: Aug 14 2018 1:27AMपिंपरी : प्रतिनिधी

गोमांस वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेले असताना पोलिसाच्या अंगावर थेट मोटार चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. सोमवारी (दि.13) पहाटे तीन वाजताच्या सुमारास दिघी मॅगझिन चौकाजवळ ही घटना घडली. 

सुरेश शिंदे (वय 40) असे जखमी पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक खंडेराव खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे दिघी मॅगझिन चौकातील प्रगती हॉटेलजवळील मोकळ्या मैदानात काहीतरी गैरप्रकार सुरू असल्याची माहिती दिघी पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यानुसार पोलिस 

हवालदार सुरेश शिंदे त्यांच्या एका सहकार्‍यासोबत घटनास्थळी दाखल झाले. त्यांना त्याठिकाणी एक स्कॉर्पिओ मोटार संशयास्पदरित्या थांबलेली दिसली. पोलिसांना पाहताच पळून जाण्याच्या तयारीत असणार्‍या आरोपींनी मोटार पोलिसांच्या अंगावर घातली. यामध्ये शिंदे यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाल्याने आरोपींनी मोटार सोडून घटनस्थळावरून पळ काढला. मोटारीची तपासणी केली असता त्यामध्ये गोमांस आढळून आले. तसेच याठिकाणी मैदानात गोमांसाची कत्तल करून तस्करी होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मांसाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्यानंतर हे गोमांस आहे की नाही हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी शिंदे यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले.