Fri, Jul 19, 2019 05:16होमपेज › Pune › ४४ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

४४ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 1:02AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील गोविंद गोपाळ महार (गायकवाड) यांच्या समाधीवरील छत आणि माहितीफलकाची मोडतोड करून शिवीगाळ केल्याप्रकरणी गावातील 51 जणांवर ‘अॅट्रॉसिटी’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील 44 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज ग्राह्य न धरता फेटाळून लावला आहे. अॅट्रॉसिटीच्या कलम 18 च्या बाधेनुसार अटकपूर्व जामीनावरील सुनावणी सत्र न्यायालयात चालविणे शक्य नसल्याने न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. विशेष न्यायाधीश पी. सी. भगुरे यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे. यापूर्वी सात जणांना अटक होऊन त्यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. 

अनुप राजाराम कोठावडे (35), शरद काळुराम दाभाडे (23), सोनेश बाळासाहेब शिवले (29), सागर कांताराम आरगडे (20), नवनाथ संपत कुंभार (22), रामदास ज्ञानोबा शिवळे (46) आणि ऋषिकेश गोरक्ष आरगडे (20, सर्व रा. वढू बुद्रुक, शिरूर) यांना अटक होऊन त्यांचा जामीन न्यायालयाने नुकताच मंजूर केला आहे. याबाबत सुषमा सुभाष ओव्हाळ (27, रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कोरेगाव-भीमा  येथील संघर्षाच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त वढू गावात फ्लेक्स लावला होता. तो फ्लेक्स गुन्हा दाखल केलेल्यांपैकी काही जणांनी फाडला. तसेच वढू बुद्रुक गावाच्या हद्दीतील गोविंद गोपाळ महार (गायकवाड) यांच्या समाधीवरील छत्रीची मोडतोड करत नासधूस केली, तसेच शिवीगाळ केली. त्यावरून गावात तणाव निर्माण झाला. त्यानंतर याप्रकरणी 51 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात अटक केलेल्या व्यतीरिक्त इतरांनी अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतल्यानंतर न्यायालयाने बचाव पक्षाचे म्हणणे ऐकले परंतु, अॅट्रॉसिटीच्या कलम 18 च्या बाधेमुळे सत्र न्यायालयात हा अर्ज चालविणे शक्य नसल्याने न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. बचाव पक्षाच्या वतीने अॅड. अशोक संकपाळ यांनी गुन्हा दाखल झालेल्या 44 जणांच्या वतीने अटकपूर्व जामीनासाठी बाजू मांडली. दरम्यान, या प्रकरणात उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करणार असल्याचे अॅड. संकपाळ यांनी सांगितले.