Sun, Jul 21, 2019 15:05
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › गुंडांच्या दहशतीने शहरात भीतीचे वातावरण

गुंडांच्या दहशतीने शहरात भीतीचे वातावरण

Published On: Dec 18 2017 2:41AM | Last Updated: Dec 18 2017 12:59AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. वर्दळीच्या ठिकाणी किरकोळ कारणावरून तसेच पूर्वीच्या भांडणातून गुंडांचे टोळके हातात धारदार हत्यारे घेऊन समोरच्याला संपवण्याचे प्रयत्न करत आहेत. तसेच परिसरात आणि समोरच्यावर स्वतःची, स्वतःच्या टोळीची दहशत निर्माण व्हावी यासाठी रस्त्यावरील वाहनांची तोडफोड, घरांवर दगडफेक यासारखे प्रकार घडत आहेत. यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून गुन्हा घडल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाते, मात्र असे गुन्हे रोखणे पोलिसांना शक्य होत नाही.

दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उसणे पैसे दिले नाहीत म्हणून टोळक्याने परिसरातील दुकानांची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. पप्पू ऊर्फ अभिमन्यू शितोळे याच्यासह इतर दुकानांची तोडफोड केली. सिद्धेश्‍वर सीताराम गोवेकर, बालाजी मारुती वाळुंज या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांचे इतर साथीदार अद्याप फरार आहेत. पिंपळेगुरव येथे टोळक्याने शत्रुघ्न श्याम पालमपल्ले याच्यावर पूर्वीच्या भांडणातून हल्ला केला. यामध्ये सांगवी पोलिसांनी सहाजणांना अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने उदयास येणार्‍या गुन्हेगारी टोळ्यांचा मोठा त्रास होत आहे. यामध्ये 16 ते 25 वयोगटातील तरुणांचा सर्वाधिक सहभाग आहे.
परिसरात सुरू असलेल्या किरकोळ प्रकारच्या वादावादीकडे  पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी खबर्‍यामार्फत परिसरातील हालचालीवर लक्ष ठेवल्यास असे गुन्हे रोखण्यात यश येऊ शकते. अनेक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठवणे एवढेच करता येते. मात्र, ही मुले बाहेर आल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीकडे वळतात.
शहरात माथेफिरूंकडून वाहनांची तोडफोड, जाळपोळ असे प्रकार होतात. गुन्हेगारांवर, गुंडांवर पोलिसांचा कसलाच वचक नसल्याने असे गुन्हे घडत असल्याचे नागरिकांचे मत आहे.