Sun, Jul 21, 2019 01:33होमपेज › Pune › शरद पवारांना बाळासाहेब ठाकरेंच्या जागी मानतो : नांदगावकर

शरद पवारांना बाळासाहेब ठाकरेंच्या जागी मानतो : नांदगावकर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणेः प्रतिनिधी

राजकीय कोपरखळ्या आणि एकमेकांच्या भाषणातील कोट्यांमुळे माजी खासदार अशोक मोहोळ यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा हास्यरंगांनी फुलून गेला. मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी राजकारणातील फेरीवाल्यांच्या वाढलेल्या संख्येवरुन सुरु केलेल्या बॅटिंगने कार्यक्रमाची रंगत वाढली आणि सर्वपक्षीय नेत्यांमध्येही कलगीतुरा रंगला.

मोहोळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रविवारी सत्कार संपन्न झाला. त्यावेळी कार्यक्रमास सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी दिसून आली. राज्यात निष्ठा हा शब्द लोप पावत चालला आहे. काय करावे हे कळायला मार्ग नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या जागी मानतो. सध्या आमच तर कुठेही सरकार नाही. त्यामुळे सध्या फेरीवाले सापडल्यापासून बरे झाले आहे. तसे राजकारणातही फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांना फेरीवाल्यांबाबत अनुभव चांगला असल्याचा उल्लेख नांदगावकर यांनी करताच सभागृहात एकच हशा पिकला. ते म्हणाले की, शरद पवार यांचे बोट धरून अनेक जण राजकारणात आले. अगदी गुजरातचे लोक पण आले आणि देशाचे पंतप्रधान झाले. मात्र, आम्ही अजून इथेच आहोत. बापट साहेब तुम्ही पवार यांची करंगळी तरी पकडा म्हणजे तुम्ही दिल्लीत तरी जाल. पवार यांना पद्मविभूषण मिळाला असला तरी दुसरा पी म्हणजे पंतप्रधानपद कधी मिळणार अशी मराठी माणसांची खंत असल्याचेही ते म्हणाले.

त्यावर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, बाळा नांदगावकर हे "मनसे" बोलले आहेत. पुणे ही राजकीय लोकांची खाण आहे. ते पाहिल्यानेच पतंगराव कदम हेसुद्धा पुण्यात वास्तव्यास आहेत. 

पंतप्रधान पदाची आशा सोडलेली नाही

त्यांच्या भाषणाचा धागा पकडत कदम म्हणाले की, व्यासपीठावर काँग्रेसचे एकमेव आमदार संग्राम थोपटे आहेत. यावेळी पुणे जिल्ह्यात ही संख्या वाढवायची आहे. शरद पवार यांच्या पंतप्रधान पदाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, आम्ही आशा सोडलेली नाही. आज ना उद्या हे आमच्या डोक्यात आहेच. यशवंतराव चव्हाण साहेबानंतर पवार हेच. दुसरा तिसरा कोणीही नाही. आम्ही कुठेही असूद्यात,असेही ते म्हणाले.

पालकमंत्री बापट म्हणाले की, लोकप्रतिनिधी पद गेले की अनेक लोक अस्ताव्यस्त होतात. खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे पाहत ते म्हणाले की शिवसेना कधी भाजपबरोबर असते किंवा नसते, असे म्हणताच हशा पिकल्याने कार्यक्रमाची रंगत वाढतच गेली. काही नांवे भाषणात घेतली नाही तर काय होईल सांगता येत नाही. त्यात पतंगरावांचे नाव पहिल्यांदा घ्यावे लागेल. हा माणूस पुणे विद्यापीठात घुसला आणि आता पुणे विद्यापीठच भारती विद्यापीठात घुसले अशी कोपरखळीही बापट यांनी मारली. 

या सर्व भाषणानंतर माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांनी या राजकीय विषयाला बगल देत मोहोळ कुटुंबीयांच्या योगदानावर भाषणात भर दिला. सत्काराच्या उत्तरात बोलताना अशोक मोहोळ म्हणाले की आतासारखे राजकारण आमच्या काळात नव्हते. कार्यकर्ते भेळभत्ता खावून काम करीत होते. दुसरी कशाचीही अपेक्षा करीत नव्हते. मात्र, आता राजकारणाचे व्यापारीकरण झाल्यासारखे वाटते.