होमपेज › Pune › पुणे : तोडफोडप्रकरणी अटक असलेले गिरवले यांचा मृत्यू

पुणे : तोडफोडप्रकरणी अटक असलेले गिरवले यांचा मृत्यू

Published On: Apr 17 2018 7:21AM | Last Updated: Apr 17 2018 7:50AMपुणे / नगर : प्रतिनिधी

नगरसेवक कैलास रामभाऊ गिरवले (वय ५५) यांचे पुण्यात उपचारादरम्यान सोमवारी रात्री निधन झाले. केडगाव येथील हत्याकांडानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले होते. त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला झाला. या गुन्ह्यात गिरवले यांना अटक झाली होती. याप्रकरणी गिरवले न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना कोतवाली पोलीस ठाण्यातील दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले. या गुन्ह्यात त्यांना रविवारी न्यायालयीन कोठडीची मंजुरी मिळाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. गिरवले यांना उपचारासाठी प्रथम जिल्हा रूग्णालय व नंतर पुणे येथील ससूण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

गिरवले यांना रविवारी दिवसभर कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते. मात्र सायंकाळी त्यांची प्रकृती ढासळली आणि अधिकच चिंताजनक बनली. गिरवले यांच्याबाबत रविवारी सायंकाळी सोशल मीडियावर चुकीची अफवा पसरली. याबाबत पोलीस प्रशासनाने सोमवारी प्रसिद्धी पत्रक काढून गिरवले यांच्यावर ससूण रूग्णालयात उपचार सुरू असून, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले होते. मात्र रात्री उशीरा त्यांचा मृत्यू झाला.

कैलास गिरवले हे सुरवातीला भाजपचे कार्यकर्ते होते. त्यानंतर त्यांनी महापालिकेची अपक्ष निवडणूक लढविली होती. तत्कालीन नगरपालिकेत ते दोनवेळा नगरसेवक झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही त्यांनी शहरात नेतृत्व केले. २००८ आणि २०१३ मध्ये मनसेत असताना त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण जगताप आणि संग्राम जगताप यांचे ते कट्टर समर्थक होते.

पोलिसांकडून मारहाण: कुटुंबियांची तक्रार

पोलिसांनी अटक केल्यानंतर बेदम मारहाण केली होती, या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा तक्रार अर्ज त्यांच्या कुटुंबियांना बंडगार्डन पोलिस ठाण्यात दिला आहे.