Fri, May 24, 2019 06:25होमपेज › Pune › कोरेगाव भीमा : राहुलच्या मारेकऱ्यांना लवकर शोधा

कोरेगाव भीमा : राहुलच्या मारेकऱ्यांना लवकर शोधा

Published On: Jan 10 2018 4:44PM | Last Updated: Jan 10 2018 4:43PM

बुकमार्क करा
रांजणगाव गणपती : वार्ताहर

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारात राहुल फटांगडे या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याच्या मारेक-यांचा शासनाने शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करावी अन्यथा राज्यव्यापी व देशव्यापी आंदोलन करून सरकारला धारेवर धरण्यात येईल, असा इशारा शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर-पाटील यांनी दिला.

सणसवाडी (ता. शिरुर) येथे १ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारातील मृत राहुल फटांगडेचा दशक्रिया विधी आज, झाला. त्यावेळी भोर-पाटील यांनी सरकारला इशारा दिला. ते म्हणाले, 'बाहेर गावाहून आलेल्या समाज कंटकानी हिंसाचाराचे निमित्त करुन राहुलची हत्या केली. त्याचा बळी घेतला आहे. स्थानिक नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तरी ही समाज शांत आहे. मात्र, सरकार चौकशीच्या नावाखाली स्थानिकांना त्रास देत आहे. हा त्रास थांबला पाहिजे. अन्यथा राज्यव्यापी व देशव्यापी आंदोलन ऊभारू.'

या प्रंसगी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका जयश्री पलांडे , पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे,  वाल्मिकराव कुरुंदळे, भगवान शेळके, दत्तात्रय पाचुंदकर, दत्ताञय हरगुडे, छावा संघटनेचे धनंजय जाधव, कान्हुर मेसाईचे माजी उपसरपंच दिपक तळोले आदींनी मनोगते व्यक्त केली. पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका हरगुडे, कारेगावचे सरपंच अनिल नवले, बाबुराव पाचंगे, अनिल बांडे, कान्हुर मेसाईचे सरपंच दादाभाऊ खर्डे,  चेअरमन आनंदा पुंडे, सुधीर पुंडे, रामकृष्ण पुंडे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष भास्कर पुंडे, आमदाबादचे माजी सरपंच प्रकाश थोरात यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, बाजार समितीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे यांनी राहुल फटांगडे यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी लवकरच सणसवाडी येथे बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

राजकारण्यांनी फिरवली पाठ
राहुल फटांगडेंच्या दशक्रिया विधीकडे तालुक्यातील बहुतांश राजकीय नेत्यांनी पाठ फिरवल्याने नागरिकांमधून राजकीय नेत्यांविषयी संताप केला जात होता. शिरुर लोकसभा व शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदार संघातील कान्हुर मेसाई हे गाव राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे समजले जात आहे. मात्र, या दशक्रिया विधीसाठी खासदार व आमदार हे तर आले नाहीच पण त्याचे प्रतिनिधी ही इकडे फिरकले नसल्यामुळे ३९ गावांमध्ये फक्त मतांचा जोगवा मागायलाच फिरणार का? असा सवाल उपस्थित नागरिक करत होते.