होमपेज › Pune › चिंचवडमध्ये मराठा आंदोलकांची धरपकड

चिंचवडमध्ये मराठा आंदोलकांची धरपकड

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:32AMपिंपरी : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी मराठा सेवा संघ आणि क्रांती मोर्चाच्या वतीने चिंचवड येथे घोषणाबाजी करीत आंदोलन केले. या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली. एकूण 21 जणांना ताब्यात घेऊन वाकड पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिंचवडमधील होणारी सभा उधळून लावणार, असा इशारा या संघटनांनी दिला होता. त्यामुळे पोलिसांनी ‘झीरो रिस्क फॅक्टर’ चालवला. सतर्क झालेले पोलिस आंदोलनकर्त्यांवर बारीक नजर ठेवून होते. संघटनेच्या दीडशेजणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री येण्याच्या मार्गासह चिंचवडच्या गल्लीबोळात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सकाळी दहाच्या सुमारास आंदोलनकर्ते चिंचवड स्टेशन येथून घोषणाबाजी करीत लोकमान्य रुग्णालयापर्यंत आले. मात्र, तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. या वेळी आंदोलनकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत होते. सतीश भास्कर काळे, मारुती साहेबराव भापकर, प्रकाश शिवाजी जाधव, नकुल आनंदा भोईर, सुधीर दामोदर एंडे, रसीद इस्माईल सय्यद, ज्ञानदेव व्यंकटराव लोभे, विनायक विठ्ठल जगताप, प्रवीण सुरेश बोर्‍हाडे, गणेश दिलीप कोकाटे, वैभव सूर्यकांत जाधव, अभिषेक अक्षय म्हसे, अक्षय कुंडलिक गोंदील, प्रकाश सुरेश जाधव, भय्यासाहेब बाबासाहेब गजधने, लहुजी कोंडिबा लांडगे, अमोल माधवराव  मानकर, किरण सुरेश जंजाळे, जीवन गंगाधर बोराडे, समीर लायक शेख, दत्ता मोहन शिंदे या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. 

महिलेचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना ‘एक मराठा लाख मराठा’ अशी आरोळी देत एका महिलेने सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, सभेमध्ये साध्या वेशात तैनात असलेल्या पोलिसांनी तिला तत्काळ ताब्यात घेतले. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे संघटनांचा सभा उधळण्याचा डाव फसला.