Thu, May 23, 2019 20:40
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › ‘कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक’चा गैरवापर

‘कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक’चा गैरवापर

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 1:17AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

आई म्हणजे परमेश्‍वरी संवेदना असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या  अपर्णा रामतीर्थकर यांनी  येथे केले. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 चा  गैरवापर केला जात आहे, त्यामुळे अनेक निष्पाप सासवा भरडल्या जात आहेत. स्त्रियांच्या हाती कायद्याची ढाल दिली; पण त्यांनी कायद्याची तलवार केली असल्याची खंत अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केली.

स्वामी विवेकानंद जयंती आणि संक्रांतीचे औचित्य साधून प्राधिकरणातील स्वामी विवेकानंद मित्रमंडळाच्या वतीने ’आई’ या विषयावर अपर्णा रामतीर्थकर यांचे व्याख्यान झाले. त्या वेळी त्या  बोलत होत्या. या वेळी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक राजू मिसाळ, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मंगेश वर्टीकर, उद्योजक रंगनाथ गोडगे-पाटील, मुख्य संयोजक चंद्रकांत ऊर्फ बाळा शिंदे उपस्थित होते. 

अपर्णा रामतीर्थकर  म्हणाल्या, भारतीय संस्कृतीत आईला महत्त्वाचे स्थान आहे; परंतु पूर्वीच्या आईच्या जागी आता ‘मम्मी’ आली आहे. टीव्ही मालिकांच्या आभासी जगात महिला हरवून गेल्या आहेत. पाश्‍चात्त्य विचारांच्या प्रभावामुळे भारतीय संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांची मृत्युघंटा वाजू लागली आहे. सिमेंटची जंगले वाढत आहेत आणि  रक्ताची; तसेच जवळची नाती हळूहळू संपुष्टात येऊ लागली आहेत. 

दोन सख्ख्या भावांमध्ये आईला कोणी सांभाळायचे यावरून भांडणे होत आहेत आणि न्यायालयात वकिलांचा धंदा  जोरात चालला आहे.  या सर्व अनर्थाला ‘आई’ आणि ‘शिक्षक’ हे दोन घटक जबाबदार आहेत. मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी आईची आणि नंतर शिक्षकाची असते. लहान मुले नेहमी या दोन घटकांचेच अनुकरण करीत असतात; परंतु आई आता फॅशनमध्ये आणि शिक्षक सहाव्या वेतन आयोगामुळे मिळणार्‍या घसघशीत पगाराने परमिट रूममध्ये रमले आहेत. 

रामतीर्थकर म्हणाल्या, मुलींना भरपूर शिकवा; पण त्यांच्यातील स्त्रीसुलभ भावना जागी ठेवा. मुली उच्चशिक्षित होत आहेत; पण त्या संस्कारक्षम, विनम्र झाल्यात का, हा अंतर्मुख करणारा प्रश्‍न आहे. 
काळाची गरज म्हणून इंग्रजी जरूर शिकवा; पण मुलांना ‘इंग्रज’ बनवू नका, असे आवाहन रामतीर्थकर  यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजनात रामचंद्र वारंग, संतोष ढाणे, स्वप्निल कणसे, पंकज खोपडे, श्रीनिवास पाटील, सुनील जमखंडीकर, प्रशांत गोडगे-पाटील, आकाश झगडे, महेश महाजन, अशोक काचोळे, किशोर दरेकर, बबलू सुपेकर, अनिल शेलार यांनी सहकार्य केले. शीतल कापशीकर यांनी सूत्रसंचालन केले. अक्षय शेळके यांनी आभार मानले.