Fri, Apr 19, 2019 12:31होमपेज › Pune › अण्णा काही सरकारला बधेनात!

अण्णा काही सरकारला बधेनात!

Published On: Mar 24 2018 9:03PM | Last Updated: Mar 24 2018 9:03PMपुणे : समीर सय्यद

सरकार आघाडीचं असो वा युतीचं... अण्णांची मनधरणी करावीच लागते. तीही त्यांच्या गावी राळेगण सिद्धीमध्ये जाऊन... ‘अण्णा, आंदोलन करून नका, अण्णा, उपोषण मागे घ्या...’ अशी विनंती केल्यानंतर अण्णा आपल्याला बधले असं वाटून सरकारतर्फे बोलणी करायला आलेले मंत्री मुंबईत परतताच तोच अण्णा आपल्या आंदोलन, उपोषणाची घोषणा करून टाकतात..! या वेळीही राज्यातल्या भाजप सरकारने अनेक विनंत्या करूनही अण्णा आपल्या निग्रहापासून ढळले नाहीत. आणि त्यांनी सरकारविरोधात दिल्लीत रामलीला मैदानावर उपोषण सुरू केलेच.

2011मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या जनलोकपाल आंदोलनामुळे यूपीए सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. परिणामी मनमोहन सिंग सरकाला सत्तेेतून पायउतार व्हावे लागले. त्यावेळी आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात आणि राज्यात विराजमान झाले. सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने अण्णांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. मोदी सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण होतील, असा सुरुवातीच्या काळात अण्णांना विश्‍वास होता. मात्र, सत्तेत येऊन चार वर्षे उलटली तरीही अण्णांच्या मागण्यांचे पुढे काहीच झाले नाही. या चार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयावर अण्णांनी क्वचितच टीका केली. अण्णांच्या 43 पत्रांना केंद्र सरकारकडून एकही उत्तर दिले गेले नाही. त्यामुळे अण्णा हजारे यांनी सरकार विषयी नाराजी व्यक्त करत आंदोलनाची घोषणा केली. अण्णांचे आंदोलन होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी विशेष जोर लावला होता. मात्र, शेवटी अण्णांनी रामलीला मैदानावर आंदोलनाला सुरुवात केलीच. त्यामुळे फडणवीस सरकार अण्णांचे आंदोलन थोपविण्यात पूर्णपणे अपयशी ठरले.

अण्णांनी जनलोकपाल कायद्याची अंमलबजावणी करावी, शेती उत्पादनांना हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी केंद्रातील भाजप सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा सहा महिन्यापूर्वी दिला होता. तेव्हापासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांनी अण्णांनी आंदोलन करू नये, यासाठी राळेगणसिद्धीच्या वार्‍या वाढवल्या होत्या. एवढेच नव्हे तर अनेक सरकारी प्रकल्पही अण्णांच्या राळेगण सिद्धी गावातून सुरू करण्यात आले. राज्यातील पहिला मुख्यमंत्री कृषी सौरऊर्जा प्रकल्प आणि ग्राम सुरक्षा दलाची अंमलबजावणी राळेगणसिद्धीतून केली गेली. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी अण्णांचे तोंडभरून कौतुक करून अण्णांच्या मागणीनुसारच हे दोन्ही प्रकल्प राळेगणसिद्धीतून सुरू केले आहेत. यापुढेही अनेक उपक्रमांची सुरूवात ही राळेगणसिद्धीतूनच करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर राज्यातील सर्वात मोठे महाआरोग्य शिबीर राळेगणसिद्धीमध्ये घेऊन अण्णांचे संभाव्य आंदोलन टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी राळेगणसिद्धीवर लक्ष केंद्रीत केल्याने शुक्रवारी (दि. 23) सुरू झालेले आंदोलन होणार नाही यविषयी अफवा उठवल्या जात होत्या. त्याच कार्यक्रमानंतर अण्णांनी आंदोलन होणारच, असे ठणकावून सांगितले होते. त्यानंतर गिरीष महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांनी अण्णांचे मन वळवण्याचा प्रयत्न देखील केला. परंतुु जनलोकपालाची अंमलबजावणी, शेतकर्‍यांना हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवू असा इशारा अण्णांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. तर याचवेळी आंदोलन होऊ नये, यासाठी मोदी सरकार आंदोलक रामलीला मैदानपर्यंत पोचू नयेत यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याचा आरोप अण्णांनी केला आहे.

अण्णांनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बंद खोलीत अण्णांशी चर्चा केली होती. तसेच जाहीर कार्यक्रमात अण्णांचे कौतुक केले होते. त्यामुळे आण्णा आंदोलन करणार नाहीत, असा समज भाजप समर्थकांनी परवला होता. मात्र, तसे न होता अण्णांनी गुरुवारी आंदोलनाला सुरुवात केली आहे. अण्णांसोबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्ली गाठली. केंद्रीय कृषीमंत्र्यांना सोबत घेऊन अण्णांची महाराष्ट्र सदनामध्ये भेट घेऊन चर्चा केली. अण्णांच्या बहुतांश मागण्या आम्ही यापूर्वीच मान्य केल्या केल्याचे महाजन यांनी सांगितले. तसेच आंदोलनाला येणार्‍या वाहनांची अडवणूक केली जात असल्याच्या आरोपाचे खंडन केले. अण्णांनी आपल्या तब्येतीचा विचार करून उपोषण जास्त दिवस ताणू नये, असा सल्लाही महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. 

अण्णांचे असे झाले होते कौतुक...

ग्रामविकास आणि लोकसहभागाचा विचार ज्या राळेगण सिद्धीतून संपूर्ण देशात रुजला त्याच ठिकाणी देशातील पहिल्याच सौर फिडरचे भूमिपूजन होत आहे. या गावात दोन महत्वपूर्ण योजनांचा शुभारंभ होत आहे. ग्रामरक्षक दलाची स्थापना व त्यासाठी कायदा करण्याची भूमिका अण्णांनी मांडली होती. त्यानुसार या कायद्याला मूर्त स्वरूप देण्यात आले. अण्णांनी सुचविलेल्या सर्व दुरुस्त्यांचा समावेश यात केला आहे. या कायद्यामुळे गावागावांतील अवैध दारूचे संकट टळणार आहे. अवैध दारू उत्पादन व विक्रीस या कायद्याने आळा बसणार आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीतून एक आदर्श गाव तयार होऊ शकेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी व्यक्त केली होती. राळेगण सिद्धीने या राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. सौर कृषी फिडर व ग्राम सुरक्षा दलाची स्थापना यासाठी पथदर्शी म्हणून नगर जिल्ह्याची निवड ही आनंदाची बाब असल्याचे पालकमंत्री राम शिंदे म्हणाले होते. यामागे अण्णा हजारे यांची दूरदृष्टी असून त्यातून या प्रकल्पांना प्रेरणा मिळाल्याचे कौतुक शिंदे यांनी केले होते.

 

Tags : pune, pune news, anna hajare, activist,  ralegansidhi, government request to revoke fast protest,