होमपेज › Pune › ‘पुरंदर’ : अटकपूर्व जामीन फेटाळला

‘पुरंदर’ : अटकपूर्व जामीन फेटाळला

Published On: Aug 12 2018 1:02AM | Last Updated: Aug 12 2018 12:34AMपुणे : प्रतिनिधी

बोगस पुरंदर विद्यापीठाच्या संस्थापकाचा अटकपूर्व जामीनअर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. के. कर्‍हाळे यांनी फेटाळला आहे. बोगस विद्यापीठ सुरू करून, त्या माध्यमातून खोट्या पदव्या देऊन अनेक विद्यार्थ्यांची आणि शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी दादासाहेब गुलाबराव जगताप (वय 45, रा. सासवड) याच्यावर उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय पांडुरंग नारखेडे यांनी सासवड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग) आणि शासनाची परवानगी न घेता पुरंदर विद्यापीठ सुरू करण्यात आल्याचा प्रकार ‘पुढारी’ने उघडकीस आणला होता. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने 8 मार्च 2018 रोजी अनधिकृत संस्था, अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम प्रतिबंधक कायद्यानुसार जगताप आणि त्याच्या सहकार्‍यांना, कथित शैक्षणिक संस्थेत चालवित असलेले अभ्यासक्रम, पाठ्यक्रम तात्काळ बंद करण्याचा आदेश दिले होते. त्यानंतर 9 मार्च 2018 रोजी जगताप आणि त्याच्या सहकार्‍यांनी सर्व अभ्यासक्रम बंद करत असल्याचे लेखी पत्र शिक्षण खात्याला दिले. यापुढे अशी कोणतीही चुक होणार नाही, असा उल्लेख या पत्रात त्यांनी केला आहे.

त्यानंतर अनाधिकृत संस्था, अनाधिकृत पाठ्यक्रम प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षण सहसंचाकलांनी त्यांना 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला. तो दंड अद्यापपर्यंत भरलेला नाही. त्यानंतर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली. या प्रकरणात दादासाहेब जगताप याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी या प्रकरणी अनेक बाबींचा तपास करावयाचा असल्याचे सांगून त्यास विरोध केला.