Tue, Jul 23, 2019 17:00होमपेज › Pune › चारा खा, पाणी प्या  अन् भुर्रकन उडून जा

चारा खा, पाणी प्या  अन् भुर्रकन उडून जा

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 12:42AMइंदोरी :  राजाराम लोंढे

मावळ तालुक्यातील नानोलीतर्फे चाकण येथील शेतकरी राजाराम गणपत लोंढे  यांनी आपल्या शेतातील 3 एकर 3 गुंठे क्षेत्रातील सुमारे 20 गुंठ्यांतील अडीच महिन्यांची ज्वारी पक्ष्यांसाठी राखीव ठेवली आहे.  शेतीपासून चारही बाजूस सामान अंतरावर अवघ्या 20 मीटरवर पक्षांसाठी पाणी पिण्यासाठी झाड़ाखाली सोय केली आहे.  यामुळे या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ पक्ष्यांचे थवे दिसत आहेत.पक्षांचा चिव चिवाट कानावर ऐकू येतो. इंदोरी - नानोली तर्फे चाकण रस्त्यावर लोंढे यांची शेती आहे. या परिसरातील बहुतांश शेतकरी ऊस शेती करतात.

त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे पक्षांचे थवे दिसत नाही. ज्या शेतकर्‍यांनी या परिसरात धान्य शेती केली आहे ते शेतकरी आपल्या धान्यांचे पक्षांपासून संरक्षण होण्यासाठी शेतात ठाकर, कातकरी समाजातील मजूर धान्य राखण्यासाठी कामाला ठेवतात. त्यामुळे या परिसरात पक्ष्यांच्या थव्यांचे दर्शन क्‍वचितच होते. सध्या पूर्व मावळ परिसरात उष्णतेचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे ; वाढत्या उष्णतेचा फटका पशु-पक्ष्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. अशा परिस्थितीत माणूस एकमेकांच्या मदतीसाठी धावून जातो. पण, पशू-पक्ष्यांचे काय? हा विचार लक्षात घेऊन  शेतकरी  लोंढे यांनी आपल्या शेतातील 20 गुंठेतील ज्वारीचे उत्पादन न घेता ती पक्ष्यांना खाद्य म्हणून राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. 

लोंढे यांनी 3 एकर 3 गुंठे क्षेत्रात  ज्वारीचे पीक घेतले आहे. अंदाजे 18 ते 20 पोती याप्रमाणे त्यांना उत्पादन मिळणे अपेक्षित होते. परंतु, त्याकडे न पाहता आपल्या  क्षेत्रातील 20 गुंठे  क्षेत्र कडक उन्हातही अन्न-पाण्याच्या शोधात फिरणार्‍या पक्ष्यांसाठी त्यांनी ठेवले आहे. त्यांच्या या निर्णयाचे त्यांच्या कुंटुबातून स्वागत होत आहे. 

 

  राजाराम लोंढे , शेतकरी (नानोली तर्फे चाकण मावळ)

 यंदाचा उन्हाळा खूप कडक असून, माणसालासुद्धा घराबाहेर पडणे अवघड आहे. मग हे पशुपक्षी अशा उन्हात आपले अन्न पाणी कसे शोधणार, असा प्रश्न मला पडला. त्यातूनच ज्वारीचे पीक पक्ष्यांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय मी घेतला. पुढील वर्षीही पशू-पक्ष्यांसाठी खाद्य व पाणी उपलब्ध करून देणार आहे.