Tue, Apr 23, 2019 09:46होमपेज › Pune › अमित शहा, मुख्यमंत्रांनी घेतले माऊलींच्या पालखीचे दर्शन(Video)

अमित शहा, मुख्यमंत्रांनी घेतले माऊलींच्या पालखीचे दर्शन(Video)

Published On: Jul 08 2018 3:02PM | Last Updated: Jul 08 2018 3:02PMपुणे : प्रतिनिधी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  रविवारी (दि. 8)  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे दर्शन घेतले. शनिवारी पालखीच्या पुण्यातील आगमनानंतर नानापेठेतील विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम होता. दरम्यान, मंदिर समितीतर्फे अमित शहा यांचा  उपरणे, स्मृतिचिन्ह, गांधी टोपी देऊन सन्मान करण्यात आला.

भाजपाध्यक्ष अमित शहा पक्षाच्या संपर्क फॉर समर्थन अभियाना अंतर्गत पुणे दौर्‍यावर असून आज (8 जुलै) त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. या पुणे भेटीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याबरोबर माउलींच्या पालखीचे दर्शन घेतले. नानापेठेतील विठ्ठल मंदिर परिसरात पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

माउलींच्या दर्शनासाठी रांगेत उभे असणारे भक्त आणि मुख दर्शनासाठी आलेल्या भक्तांना ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्थेमुळे काही काळ पालखीपासून दूर ठेवण्यात आले. ऐनवेळी सुरक्षा वाढविण्यात आल्याने मुख दर्शनासाठी आलेल्या भक्तांना विठ्ठल मंदिराच्या परिसरातून दूर करण्यात आले. त्यामुळे, माउलींच्या दर्शनाच्या ओढीने आलेल्या भक्तांचा हिरमोड झाला. अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांनी मंदिर समितीचा सत्कार स्वीकारल्यानंतर दौर्‍याच्या पुढील नियोजनानुसार मार्गक्रमण केले.