Mon, Jul 06, 2020 10:07होमपेज › Pune › पैसे भरा; अन्यथा रुग्ण दुसरीकडे हलवा

पैसे भरा; अन्यथा रुग्ण दुसरीकडे हलवा

Last Updated: Oct 10 2019 1:26AM
पिंपरी ः प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) रुबी अलकेअर रुग्णांबाबत अनास्था दाखवीत आहे. हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपये भरा; अन्यथा रुग्णाला दुसर्‍या रुग्णालयात हलवा, असे सांगत एका रुग्णाला मंगळवारी (दि. 9) अन्य रुग्णालयात हलविण्यास भाग पाडले.  महात्मा फुले योजनेअंतर्गत योजना येत नसल्याने दोन लाख रुपये भरा, असे लेखी पत्रदेखील विभागाच्या वतीने संबधित रुग्णाच्या नातेवाइकांना दिले गेले. मात्र, इतर रुग्णालयांत संबंधित रुग्णाची महात्मा फुले योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) हृदयावरील उपचारासाठी रुबी अलकेअर विभाग सुरू करण्यात आला. रुग्णालयाची जागा असली तरी खासगी तत्त्वावर हा विभाग चालू आहे. या विभागात महात्मा फुले योजनेअंतर्गत येणार्‍या शस्त्रक्रियादेखील केल्या जातात; मात्र विभागप्रमुखाच्या  अनास्थेमुळे या विभागात रुग्णांची हेळसांड होत असल्याची तक्रार नातेवाईक करीत आहेत. आठ दिवसांपूर्वी या विभागात हृदयाच्या ब्लॉकेजवर शस्त्रक्रिया करण्यासाठी सनी जगदने या रुग्णाला दाखल करण्यात आले होते. त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगण्यात आले; मात्र त्यासाठी दोन लाख रुपये द्या, असे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

महात्मा फुले योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया करण्याची नातेवाइकांनी विनंती केली; मात्र ही शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत येत नसल्याचे रुबी अलकेअरच्या प्रमुखांनी सांगितले. पैसे भरा; अन्यथा रुग्णाला इतरत्र हलवा, असे उद्धट उत्तर दिल्याची तक्रार नातेवाइकांनी केली. त्यानंतर मंगळवारी (दि. 8) संबंधित रुग्णास आकुर्डी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या रुग्णालयात महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार होत असल्याचे सांगून उपचार सुरू केल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.  इतर ठिकाणी या योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया होत असताना रुबी अलकेअरने का नाकारले, असा सवाल नातेवाईक उपस्थित करीत आहेत.  

रुबी अलकेअरचे प्रमुख आमच्याशी उद्धटपणे बोलत होते. महात्मा फुले योजनेअंतर्गत आम्हाला पैसे दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तुमच्या रुग्णाची होणारी शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत येत नसल्याचे सांगून इतर रुग्णालयाला हलविण्यासाठी दबाव टाकला गेला. मात्र इतर रुग्णालयात आमच्या रुग्णाची महात्मा फुले योजनेअंतर्गतच शस्त्रक्रिया करण्यात आली. 
राजू रेड्डी, रुग्णाचे नातेवाईक.