Mon, Aug 19, 2019 09:14होमपेज › Pune › आळंदी ते भोसरी बसच्या तब्बल १९८ फेर्‍या रद्द

आळंदी ते भोसरी बसच्या तब्बल १९८ फेर्‍या रद्द

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

आळंदी ःश्रीकांत बोरावके 

वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता यावी, तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रदक्षिणा रस्त्याच्या कामास वाहतुकीचा अडसर ठरू नये याकरिता आळंदी शहरात सुरु करण्यात आलेली एकेरी वाहतूक अडचणीची ठरत आहे. यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर दररोज चक्काजाम होत आहे. भरीस भर म्हणून या एकेरी वाहतुकीमुळे पीएमपीएमएलच्या जवळपास 200 फेर्‍या रद्द झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांसह पीएमपीएमएलला झळ बसली आहे.

जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आळंदी शहरातील मुख्य प्रदक्षिणा रस्तारुंदीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत म्हणजेच दि. 25 ऑक्टोबरपासून दि. 10 डिसेंबरपर्यंत दोन महिन्यांच्या कालावधीसाठी आळंदी शहरात मरकळ चौक ते वाय जंक्शन या रस्त्याचे काम करीत असताना मरकळ चौक, नगरपरिषद चौक, पीसीएमटी चौक, वाय जंक्शन अशी एकेरी मार्गाने वाहतूक चालू ठेवण्याबाबत व जड वाहतूक बंद करण्याबाबत अधिसूचना जारी केली. त्यानुसार शहरात अंमलबजावणी होत आहे. यामुळे पीएमपीएमएल बसला शहरातील वाहतुकीसाठी चाकण चौकातून प्रवेश करत वडगाव चौक-मरकळ रोड चौक अशी वर्तुळाकार फेरी मारून नगरपालिका चौकात असलेल्या बसस्थानकात पोहोचावे लागते.

हे वर्तुळाकार अंतर साधारण अंदाजे एक किलोमीटरचे आहे. एकेरी वाहतुकीपूर्वी बस वाय जंक्शनवरून उजव्या बाजूस असलेला पूल क्रॉस करत थेट बसस्थानकात दाखल होत होती, परंतु आता संपूर्ण शहराला वेढा घालून जावे लागत असल्यामुळे वेळेचा अपव्यय होत असून त्यात वाहतूककोंडीत अडकल्याने गाड्या देखील नियोजित वेळेपेक्षा उशिरा मार्गस्थ होत आहेत. त्यामुळे वेळेच्या अभावाने दि. 18 ते दि. 22 नोव्हेंबर या कालावधीत मार्ग 

क्रमांक 361 भोसरी ते आळंदी या बसच्या 198 फेर्‍या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना बस उशिरा येणे, बस रद्द होणे अशा समस्यांचा सामना करत अवैध वाहतुकीचा नाईलाजाने वापर करावा लागला आहे. पासधारकांची या काळात प्रचंड गैरसोय झाली आहे. पीएमपीएमएलचेदेखील जवळपास 200 फेर्‍या रद्द झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाच्या वतीने भोसरी डेपो वाहतूक अधीक्षकांनी पालिकेला याबाबत पत्रव्यवहार करत तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, पीएमपी बसस्थानक नदीच्या अलीकडील एसटी स्थानकात हलविण्याची गेल्या कित्येक वर्षांची मागणी पीएमपीएमएल व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अंतर्गत बाबींमुळे प्रलंबित असून सध्या तरी पीएमपीएमएल प्रवाशांना बस शेड्युलच्या गैरसोयीचा सामना करावाच लागणार असे दिसून येते.